हायकोर्टाचा खुलासा : सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा संदर्भ राकेश घानोडे नागपूर फौजदारी प्रकरणांमध्ये आरोपीचे वकील अनुपस्थित असतानाही अपिलीय न्यायालयांना गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देता येतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी एका अपिलावर निर्णय देताना हा जनजागृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. हा खुलासा करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ‘के. एस. पांडुरंगा’ प्रकरणातील निवाड्याचा संदर्भ देण्यात आला आहे. पारशिवनी येथील प्रकाश परशू उईके (४५) या आरोपीने जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अंतिम सुनावणीच्या वेळी त्याचे वकील अनुपस्थित होते. यामुळे उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे खुलासा करून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तहसीन मिर्झा यांच्या सहाय्याने अपील निकाली काढले. आरोपी त्याच्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. त्याच्या पत्नीचे नाव सीता होते. या प्रकरणात ४ फेब्रुवारी २०१३ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने अरोपीला भादंविच्या कलम ३०२(हत्या)अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता, सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-२(सदोष मनुष्यवध)अंतर्गत दोषी ठरविले व जन्मठेपेची शिक्षा सात वर्षे सश्रम कारावासात परिवर्तित केली. दंड व इतर शिक्षा कायम ठेवण्यात आली. अशी घडली घटना ८ आॅक्टोबर २०११ रोजी आरोपीने सीताला काठीने जबर मारहाण केली. यामुळे डोके व शरीराच्या अन्य भागाला गंभीर इजा पोहोचल्याने सीताचा मृत्यू झाला. आरोपीला सीतापासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. लग्नानंतर आरोपीने सीताला चांगले वागवले. परंतु, काही वर्षांनंतर तो सीताला वाईट वागणूक द्यायला लागला. सीताला आरोपी नेहमीच मारहाण करीत होता. आरोपी कधी तरी सुधारेल, ही आशा बाळगून सीता गप्प राहात होती.
वकिलाच्या अनुपस्थितीतही देता येतो अपिलावर निर्णय
By admin | Published: July 25, 2016 2:37 AM