योगेश पांडेआॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही; शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. भाजपने ही बाब गंभीरतेने घेतली असून, यासंदर्भात आमदारांना तंबीच देण्यात आली आहे. सभागृहाच्या कामकाजाला पूर्ण उपस्थिती लावावी, असे निर्देशच सदस्यांना नोटीसवजा पत्राच्या माध्यमातून देण्यात आले आहे.‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा लाभलेले भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी हे पत्र जारी केले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या ‘हल्लाबोल’ला त्यांचे ‘डल्लामार’ कारनामे बाहेर काढून प्रत्युत्तर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे अधिवेशन वादळी ठरणार, असे संकेत मिळाले होते. सभागृहात विरोधक आक्रमक होत असताना काही वेळा सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ कमी दिसून आले. विशेषत: विधान परिषदेत तर हे चित्र दिसून आले. सातत्याने तिसऱ्या दिवशीदेखील अनेक सदस्य अनुपस्थित असल्यामुळे अखेर पुरोहित यांनी पत्र जारी केले.सदस्यांची सभागृहातील उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. सभागृहातील कामकाजामध्ये भाजपच्या आमदारांचा सक्रिय सहभाग राहावा, हे पक्षाच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे सभागृहातील कामकाज आणि पक्षहित लक्षात घेता सदस्यांची सभागृहातील उपस्थिती अनिवार्य आहे, असे पुरोहित यांनी बजावले आहे. विधानभवनात आल्यानंतर भाजप पक्ष कार्यालयात येऊन सदस्यांनी स्वाक्षरी करावी, अल्पोपहार घ्यावा व त्यानंतर सभागृहात जाऊन पूर्णवेळ तेथे थांबून कामकाजात भाग घ्यावा, असे निर्देश या पत्राच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मागील वर्षीदेखील पक्षातर्फे संघाच्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहणाऱ्या २२ आमदारांना तंबी देण्यात आली होती.मंत्र्यांकडील कामे नंतर करून घ्याअनेक सदस्य तर विधिमंडळ परिसरात दिसून येतात. मात्र सभागृहात न येता मंत्र्यांकडील आपली कामे कशी लवकरात लवकर उरकता येतील, याकडे त्यांचा भर असतो. ही बाबदेखील पक्षाने गंभीरतेने घेतली आहे. सदस्यांनी आपली कामे करून घ्यायला काही हरकत नाही. मात्र अगोदर सभागृहात उपस्थिती लावावी व तेथील कामकाज संपल्यानंतर मंत्र्यांकडील आपली कामे करून घ्यावीत, असे राज पुरोहित यांनी स्पष्ट केले आहे.
सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या भाजप आमदारांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 7:25 PM
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही; शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. भाजपने ही बाब गंभीरतेने घेतली असून, यासंदर्भात आमदारांना तंबीच देण्यात आली आहे.
ठळक मुद्देपत्राद्वारे टोचले कान : सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे निर्देश