नागपूर : लूटमार व चोरी प्रकरणात सीताबर्डी पोलिसांना हवा असलेला व फरार गुंड अजीम बेग ऊर्फ आबू यानेच वसंतराव नाईक झोपडपट्टीत पोलिसांची वाहने पेटविली होती. त्याचा शोध घेण्यासाठी वारंवार पोलीस त्याच्या घरी धडकत असल्याने तो संतप्त होता. पोलिसांनी २४ वर्षीय आबूला अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दि. ५ नोव्हेंबरला रात्री अमरावती मार्गावरील वसंतराव नाईक झोपडपट्टी येथील पोलीस चौकीत पोलिसांनी पार्किंग केलेल्या तीन बाइकला आबूने आग लावली होती. आगीत चौकीच्या खिडक्यांचे पडदे जळाले होते. वेळीच पोलीस कर्मचारी पोहोचल्याने चौकी आगीपासून वाचली होती. सीसीटीव्ही नसल्याने आरोपींचा सुगावा लागत नव्हता, पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत असताना वसंतराव नाईक झोपडपट्टीतील आबू याच्यावर संशय आला.
त्याच्याविरोधात खून, हल्ला, लूटमार व चोरी असे गुन्हे दाखल आहेत. यात त्याला तडीपार करण्यात आले होते. त्याने काही दिवसांपूर्वी उत्तर अंबाझरी मार्गावरील झाडीत एका दाम्पत्याला लुटले होते. तो लूटमारीच्या दोन व एका चोरी प्रकरणात पोलिसांना हवा होता. पोलीस त्याच्या मागावर होते. पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या घरी जाऊन शोध घेत होते.
५ नोव्हेंबरला पोलीस त्याच्या घरी धडकले होते. मात्र पोलिसांना पाहून तो मागील दाराने पळाला होता. रात्री १.४५च्या सुमारास तो घरी परतला. तेव्हा तुझ्यामुळे पोलीस वारंवार घरी येत असल्याचे म्हणत त्याला आईने फटकारले होते. आईने फटकारल्याने आबू संतप्त झाला. पोलिसांना धडा शिकवण्याच्या हेतूने वस्तीतील पोलीस चौकीत आला. पेट्रोल टाकून वाहनांना आग लावली.
पोलीस चौकी पेटविण्याचाच त्याचा हेतू होता. मात्र अधिक वेळ थांबलो तर पकडले जाऊ या भीतीने तो काही वेळात निघून गेला. घटनेनंतर तो वस्तीत न आल्याने पोलिसांना संशय आला. सोमवारी रात्री उशिरा तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. सध्या त्याला लूटमार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.