नागपूर : पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे भयभीत झालेला कुख्यात गुन्हेगार आबू खान आता पीडित व्यक्तींना शांत व्हा, अशी विनवणी करीत आहे. आबूने दोन दिवसांपूर्वी एका तक्रारकर्त्या महिलेच्या कुटुंबीयांना फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. नागरिकांना धमकी देऊन दोन दशकांपासून दहशत पसरविणाऱ्या आबूला पहिल्यांदा अशा प्रकारे विनवणी करावी लागत असल्यामुळे पोलिसांचा दरारा सिद्ध झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने आबू टोळीची पाळेमुळे खोदण्याच्या कामाला लागले आहेत. आतापर्यंत सक्करदरा ठाण्यात आबू टोळीविरुद्ध हप्तावसुली, जमिनीचा ताबा घेणे, धमकी देणे, मारहाण, तसेच गुन्हेगारी षडयंत्राच्या पाच घटना दाखल झाल्या आहेत. आबूच्या टोळीतील सदस्य फरार आहेत. त्याचा भाऊ नसीम उर्फ छोटू खानच गुन्हे शाखेच्या हाती लागला. पोलिसांवर विश्वास पटल्यामुळे आबू टोळीपासून त्रस्त असलेले पीडित स्वत:हून तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. ताजाबाद दरगाहशी निगडित एका व्यक्तीने आबू टोळीविरुद्ध तक्रार दिली आहे. त्याची माहिती मिळताच, आबूचा भाऊ अमजदने तक्रारकर्त्याला फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली. त्याची माहिती मिळाल्यानंतर आबूने तक्रारकर्त्याच्या कुटुंबीयांना फोन केला. त्याने तक्रारकर्त्याच्या कुटुंबातील एका महिलेला, तू माझी मोठी बहिण आहे, असे सांगून तक्रार मागे घेण्याची विनवणी केली. आबूचे म्हणणे होते की, त्याला आपल्या भावाचे कृत्य माहिती नव्हते. आपण नाक घासून नागरिकांसमोर माफी मागायला तयार असल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आबूला ओळखणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काही दिवसांपर्यंत आबू आणि त्याचे कुटुंबीय ताजाबादमध्ये दहशत पसरवित होते. आबू नुकताच जनावरांची तस्करीचे मोठे रॅकेट चालवित होता. विदर्भाच्या ग्रामीण भागातून जनावरे खरेदी करून, हैदराबादला पाठविण्यात येतात. या तस्करीत दर महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत होती. आबूच त्याचे संचालन करीत होता. या रॅकेटमध्ये अडथळा आल्यामुळे त्याने महिन्याभरापूर्वी एका व्यक्तीला फोनवर धमकी दिली होती. ती क्लिपिंगही शेकडो नागरिकांनी ऐकली होती. आबूची नुकतीच व्हायरल झालेली क्लिप ऐकून नागरिकांना काही काळासाठी त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. हा गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आबूने आंबेकर, सफेलकर, साहिल सैय्यदसह अनेक गुन्हेगारांची झालेली अवस्था पाहिली आहे.
.........