लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दैनिक भास्कर समूहावर टाकलेल्या छाप्यांमध्ये प्राप्तीकर खात्याला २२०० काेटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळले आहेत. याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे. प्राप्तीकर खात्याने २२ जुलैला भाेपाळ, नवी दिल्ली, इंदूर, अहमदाबाद आणि मुंबईसह ४० ठिकाणी दैनिक भास्कर समूहाच्या मालमत्तांवर छापे मारले हाेते. त्याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने माहिती दिली. कारवाईदरम्यान माेठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहारांची माहिती व नाेंदी आढळल्या आहेत. त्यांचा तपास करण्यात येत असल्याचे ‘सीबीडीटी’ने सांगितले. ‘सीबीडीटी’ने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचे संशयास्पद चक्र आढळले असून, ही रक्कम २२०० काेटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती ‘सीबीडीटी’ने दिली. हे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. प्रत्यक्ष काेणताही व्यापार किंवा सामानाची पाेच झालेली नाही. या व्यवहारांमधून किती करचाेरी करण्यात आली आहे, तसेच इतर संबंधित कायद्यांच्या उल्लंघनाचाही तपास करण्यात येत आहे.
कर्मचारी आणि नातेवाईक बेनामी कंपन्यांचे संचालक
समूहाच्या १०० हून अधिक कंपन्या आहेत. त्यात हाेल्डींग कंपन्यांसह उपकंपन्यादेखील आहेत. बनावट व्यवहारांसाठी या कंपन्या नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांच्या नावावर उघडण्यात आल्याचा खुलासादेखील ‘सीबीडीटी’ने केला. अनेक कर्मचारी या कंपन्यांमध्ये संचालक आणि समभागधारक असल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती नाही; मात्र आपले आधारकार्ड आणि डिजिटल स्वाक्षऱ्या माेठ्या विश्वासाने दिल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या माध्यमातून समूहाने बेनामी कंपन्याच्या माध्यमातून ७०० काेटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न लपविल्याचा संशय आहे. ही रक्कम आणखी माेठी असू शकते.
-------------------------------------
या ७०० काेटी रुपयांपैकी ४०८ काेटी रुपये एका सहकंपनीला कर्जाच्या नावाखाली वळते केले. त्यासाठी केवळ १ टक्के व्याज दाखविण्यात आले आहेत.
----------------------------------------------------------
रिअल इस्टेट व्यवसायातही माेठ्या प्रमाणात गैरव्यवहार आढळला आहे. अनेक मालमत्तांची विक्री राेख व्यवहाराद्वारे करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.-----------------------------अधिकृत निवेदनामध्ये ‘सीबीडीटी’ने समूहाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही; मात्र प्रसार माध्यम, ऊर्जा, वस्त्राेद्याेग, रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील हा समूह असून, वार्षिक ६ हजार काेटी रुपयांची उलाढाल असल्याची माहिती ‘सीबीडीटी’ने दिली.