नागपूर : शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने झोपेच्या गोळ्या खाऊ घालून महिला मजुराच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या घटनेचा एका स्वयंसेवी संस्थेने आकस्मिक केलेल्या चौकशीत पर्दाफाश झाला. नंदनवन पोलिसांनी आरोपी अशोक जायसवाल (५०) आणि अल्पवयीन मुलीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे.
जायसवाल अनेक दिवसांपासून शहरात सक्रिय आहे. त्याची बांधकाम व्यवसायासह शाळाही आहे. काही काळापूर्वी तो समाजाचा अध्यक्षही होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मूळची सिवनीची रहिवासी आहे. तिचे वडील गावातच राहतात. ती आई आणि १५ वर्षाच्या बहिणीसोबत जायसवालच्या नंदनवन ठाण्यांतर्गत असलेल्या शेतातील आऊट हाऊसमध्ये राहते. तिची आई जायसवालच्या शेतात मजुरी करते. दोन्ही मुलीही तिच्यासोबत काम करतात.
जूनमध्ये पीडित मुलीच्या १५ वर्षाच्या लहान बहिणीवर भंडाऱ्याच्या एका युवकाने अपहरण करून अत्याचार केला होता. अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिला भंडाºयावरून आणल्यानंतर चौकशीत अत्याचाराचा खुलासा झाला होता.
त्याआधारे पोलिसांनी अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अद्यापही मिळालेला नाही. अपहरण आणि अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेच्या बहिणीची चौकशी करण्यासाठी मंगळवारी एका स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी घरी आले होते. चौकशीदरम्यान पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचार आणि तिच्या लहान बहिणीशी जायसवालने छेडखानी केल्याचे सांगितले.
पिडीतेच्या तक्रारीनुसार जायसवाल त्यांना तीन वर्षांपासून त्रास देत होता. त्याने पीडितेला तिच्या आईच्या सहकार्याने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. जायसवालच्या कृत्याची माहिती झाल्यानंतरही तिच्या आईने त्याला विरोध केला नाही.