नागपूर : ओळखीचा गैरफायदा घेत एका आरोपीने तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण करत जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. या प्रकारामुळे हादरलेल्या तरुणीने हिंमत करून पोलीस ठाणे गाठले व आपबिती मांडली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता (२१, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीशी ओळख होती. त्याने तिला एकांत ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. ३१ मे रोजी हा प्रकार घडल्यानंतर तो तिला दुसऱ्या दिवशी सेवाग्राम येथे घेऊन गेला. तेथेदेखील त्याने असेच कृत्य केले. यामुळे तरुणी हादरली व घाबरली होती. अखेर तिने हिंमत करत वाठोडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी विशालविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.