भगवेकरणाची चर्चा : प्रभारी कुलगुरूंना माहितीच नाहीआशिष दुबे - नागपूर भगवेकरणात आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठही मागे राहिले नाही. शनिवारी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहण्यास मिळाले. वेबसाईटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (एबीव्हीपी) जाहिरात करण्यात आली. यात १२ जानेवारीपासून स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त युवा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जाहिरातीनुसार सप्ताहाचे आयोजन विद्यापीठ छात्र संघ आणि एबीव्हीपीच्यावतीने करण्यात आल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली. परंतु जाहिरातीत विद्यापीठाच्या छात्र संघाचा केवळ उल्लेख आहे. जाहिरातीत छात्र संघ अथवा विद्यार्थी कल्याण संचालकांच्या नावाऐवजी थेट एबीव्हीपीच्या महानगर मंत्र्यांचे नाव देण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, जनसंपर्क अधिकारी शाम धोंड यांनी या बाबीचा इन्कार केला. त्यांच्या मते एबीव्हीपीची जाहिरात विद्यापीठाच्या वेबसाईटवर कशी प्रकाशित झाली या बाबीची त्यांना काहीच माहिती नाही. त्यांनी सोमवारी याची माहिती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांशी निगडित असल्यामुळे वेबसाईटवर टाकण्यात आल्याचे सांगितले. भगवेकरण करणे हा आमचा उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ते हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असून तो छात्र संघातर्फे घेण्यात येत असला तरी कुलगुरू, कुलसचिव, विद्यार्थी कल्याण संचालक अथवा छात्र संघाच्या अध्यक्षाच्या लेटरहेडवर अथवा त्यांच्यातर्फे जाहिरात का दिली नाही हे सांगू शकले नाही. विद्यापीठाच्या वेबसाईटवर कोणतीही माहिती अथवा जाहिरात विद्यापीठाचे कुलसचिव आणि कुलगुरूंच्या परवानगीशिवाय टाकू शकत नाही. त्यासाठी जनसंपर्क अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत.जाहिरातीत काय आहेमहाविद्यालयाचे प्राचार्य व संचालकांना संबोधून जाहिरात महानगर मंत्री गौरव हरडे यांनी एबीव्हीपीच्या लेटरहेडवर दिली आहे. जाहिरातीत केवळ छात्र संघाचे नाव देण्यात आले आहे. यात एबीव्हीपीची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यात छात्र संघ आणि एबीव्हीपीतर्फे १२ ते १८ जानेवारीपर्यंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित युवा सप्ताहाची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महाविद्यालयांना करावयाचे असल्याचे म्हटले आहे. जाहिरातीच्या दुसऱ्या पेजवर कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. ३ महिन्यांपासून विद्यापीठ संशयाच्या भोवऱ्यातविद्यापीठाचे भगवेकरण होण्याची चर्चा तीन महिन्यापासून सुरू आहे. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांना प्रभारी कुलगुरूपदावरून हटविण्यात आल्यानंतर ही चर्चा आणखीनच वाढली. डॉ. देशपांडे यांची अचानक प्रभारी कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर प्र-कुलगुरू पदावर डॉ. मुरलीधर चांदेकर यांची नियुक्ती झाल्यामुळे या चर्चेला आणखी पाठिंबा मिळाला. आता एबीव्हीपीच्या जाहिरात झळकल्यामुळे ही चर्चा खरी ठरत असल्याचे मानण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या वेबसाईटवर ‘एबीव्हीपी’ची जाहिरात
By admin | Published: December 28, 2014 12:40 AM