नागपूर : नागपुर शहरातील साउथ अर्न पॉईंट स्कूल येथे परीक्षा केंद्रातपरीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारानंतर केंद्रावर एकच गोंधळ उडाला असून अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रप्रमुखांना जाब विचारण्यासाठी केंद्रापुढे आंदोलन केलं. तर, एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा कुठलाही पेपर फुटला नसल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं स्पष्ट केलं आहे.
आज रविवारी सकाळी १० वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर आज एमपीएसची पूर्व परीक्षेचा पेपर होता. हा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे केंद्राबाहेर एकच गोंधळ माजलाय.
या परीक्षेच्या प्रश्नसंचाचा सील आधिच फोडण्यात आला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आज सकाळी १० वाजताचा हा पेपर होता दरम्यान एका विद्यार्थ्याला पेपरसंचाचे सील उघडले असल्याचे दिसून आले. त्याने याबाबत आपल्या मित्राला माहिती दिली. त्यानंतर, पेपर पूर्ण झाला मात्र तोपर्यंत अभाविपचे कार्यकर्ते केंद्राबाहेर जमले व पेपर फुटल्याचे म्हणत आंदोलन सुरू केले.
दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे देखील केंद्रावर आले. त्यांनी केंद्रप्रमुखांना जाब विचारत आग्रही भूमिका घेतली. यानंतर, गोंधळ वाढला व पोलिसांनीही केंद्रावर पोहचत मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच स्पष्टीकरण
या प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं असा कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.