नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदारसंघावर यंदाही अभाविपनेच झेंडा फडकवला आहे. दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अभाविपने एकूण आठ जागा पटकावल्या. आरक्षित प्रवर्गातील पाचही जागा व खुल्या प्रवर्गातील तीन जागांवर अभाविपने विजय प्राप्त केला, तर महाविकास आघाडी व युवा ग्रॅज्युएट फोरमच्या प्रत्येकी एका उमेदवाराने खुल्या प्रवर्गातून विजय प्राप्त केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक धक्का पोहोचला. युवा ग्रॅज्युएट फोरमने पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत एक जागा पटकावली.
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सहा वर्षांनंतर पार पडली. परंतु ६० हजारांमधून केवळ १३,९४९ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. पदवीधरच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढली. परंतु त्याचा फायदा आघाडीला मिळाला नाही. ॲड. मनमोहन वाजपेयी हे एकमेव आघाडीचे उमेदवार निवडून आले. राखीव प्रवर्गात तर महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला.
सिनेट परिवर्तन पॅनलचे मागे दोन उमेदवार होते. यंदा हे पॅनल फुटले. त्याचा फटका बसला. यावेळी एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. परिवर्तनमधून बाहेर पडून काहींनी युवा ग्रॅज्युएट फोरमद्वारे निवडणूक लढवली. फोरमचे राहुल हनवते हे खुल्या प्रवर्गातून विजयी ठरले.
असे आहेत निकाल
खुला प्रवर्ग
मनमोहन वाजपेयी - २०७४ - ( महाविकास आघाडी)
विष्णू चांगदे - २०१६ - (अभाविप)
मनीष वंजारी - १९६२ - (अभाविप)
राहुल हनवते - १५४६ - (युवा ग्रॅज्युएट फोरम)
अजय चव्हाण - १४६६ (अभाविप)
-राखीव प्रवर्गातील निकाल
प्रथमेश फुलेकर - अनुसूचित जाती - ५,६८७ - अभाविप
दिनेश शेराम - अनुसूचित जमाती - ५,०४१ अभाविप
सुनील फुडके - ओबीसी - ४,७६० - अभाविप
वामन तुर्के - भटके विमुक्त - ४,८०८ - अभाविप
रोशनी खेळकर - महिला - ५,१३८ - अभाविप
तब्बल ४२ तास चालली मतमोजणी
मंगळवार, दि. २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ती गुरुवार, दि. २३ मार्च रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत चाललेल्या मतदान प्रक्रियेनंतर निकाल घोषित करण्यात आले. तब्बल ४२ तास चाललेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.