लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दौऱ्यावर गेलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या घटनेविरोधात अभाविपने आक्रमक पवित्रा घेतला. शिक्षणमंत्र्यांविरोधात अभाविपतर्फे बुधवारी रेशीमबाग चौक तसेच झाशी राणी चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच सर्व अकृषी विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीत असताना याप्रकारे दौरे करत शिक्षण मंत्री काय साध्य करणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.विद्यार्थ्यांचे ३० टक्के प्रवेश शुल्क माफ करणे, परीक्षा शुल्क परत करणे, ४ टप्यांमध्ये प्रवेश शुल्क घेणे, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम या सर्व बाबींकडे शिक्षणमंत्री दुर्लक्ष करत आहेत. विद्यार्थ्याच्या समस्यांबाबत निवेदन देण्याबाबत अभाविप अमरावती महानगरद्वारा शिक्षणमंत्र्यांना वेळ मागण्यात आली होती. शिक्षणमंत्र्यांनी वेळ तर दिली नाही याउलट विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री व अन्य काही कार्यकर्त्यांना दडपशाहीच्या मार्गाने पोलिसांनी उचलून त्यांना अटक केली व रात्रीपर्यंत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले, असा आरोप अभाविपतर्फे करण्यात आला. राज्य सरकारद्वारा अभाविपच्या कार्यकर्त्यांवर झालेली दडपशाही चुकीची असून विद्यार्थ्यांनी आपल्या न्यायिक समस्यांसाठी दाददेखील मागू नये का, असा प्रश्न यावेळी नागपूर महानगरमंत्री अमित पटले यांनी उपस्थित केला.
नागपुरात शिक्षणमंत्र्यांविरोधात अभाविपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 9:12 PM