लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा रुळावर आल्या असल्या तरी काही विद्यार्थ्यांना ‘कनेक्टिव्हिटी’ची समस्या जाणवते आहे. त्यातच काही विद्यार्थ्यांचे पेपर दोन ते तीन मिनिटांमध्ये ‘सबमिट’ झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा व मूल्यमापन संचालक कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रफुल्ल साबळे यांना घेरावदेखील घालण्यात आला.
‘ऑनलाईन’ परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ‘अभाविप’ने विद्यापीठाला निवेदन दिले, मात्र काही सकारात्मक कार्यवाही विद्यापीठाद्वारे केली गेली नाही. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी परीक्षा भवनात आंदोलन केले. २५ मार्च रोजी ज्यांचे पेपर होऊ शकले नाही त्यांची परीक्षा कधी होणार तसेच सीमॅट व बीकॉमची परीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्याचे विद्यापीठ काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जे विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहिले आहे त्यांचे नियोजन करावे, अशी मागणीदेखील करण्यात आली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ. साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा
सद्यस्थितीत नागपुरात ‘कोरोना’ अक्षरश: थैमान घालत आहे. अशास्थितीत प्रत्येकाला ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील नियम न पाळता परीक्षा भवनात प्रवेश केला.