नागपूर : अवैध पद्धतीने कोट्यवधीची संपत्ती जमविल्याप्रकरणी सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक बजाज यांच्याविरुद्ध अॅण्टी करप्शन ब्युरो (एसीबी) ने पुरावे गोळा केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मागील पाच दिवसाच्या चौकशीत वसुलीच्या क्लिपिंगसह अनेक महत्त्वाचे पुरावे एसीबीच्या हाती लागले आहेत. या पुराव्याच्या आधारावर बजाज आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेरण्याची तयारी सुरू आहे. आता सर्व नजरा बजाज यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील गुरुवारी येणाऱ्या निर्णयाकडे लागल्या आहेत. एसीबीने बजाज यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती ठेवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबीला आतापर्यंत रोख रकमसह तीन कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती मिळाली आहे. सूत्रानुसार बजाज यांनी नोकरी देण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणावर वसुली केली आहे.त्यांनी नोकरीवरून काढून टाकण्याच्या नावावरही वसुली केली आहे. त्यांच्या वसुलीमुळे अनेक शिक्षक आणि इतर कर्मचारी त्रस्त होते. बजाज यांची प्रतिष्ठा आणि संपर्कामुळे समोर येण्याची कुणाची हिंमत नव्हती.त्यामुळे एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. त्यामुळे अनेक पीडित समोर आले असून काहींनी वसुलीची क्लिपिंग एसीबीला उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
एसीबीला सापडल्या वसुलीच्या क्लिपिंग
By admin | Published: October 01, 2015 3:20 AM