नागपूर : सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेल्या नेत्यांची खुली चौकशी करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सज्ज आहे. मात्र, कागदोपत्री आदेश आणि अन्य प्रक्रिया लक्षात घेता संबंधित नेत्यांची प्रत्यक्ष चौकशी सुरू व्हायला आणखी किमान दोन आठवडे लागणार आहे. एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी ‘लोकमत‘ने संपर्क साधला असता उपरोक्त बाब स्पष्ट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तसेच माजी जलसंधारण मंत्री सुनील तटकरे यांनी कोट्यवधी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप आहे. या आरोपाची एसीबीतर्फे खुली चौकशी करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे. आज विधिमंडळात तशी माहिती पसरल्यानंतर सर्वच क्षेत्रात या घोटाळ्याची चर्चा गरम झाली. या पार्श्वभूमीवर, प्रस्तुत प्रतिनिधीने एसीबीचे महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चौकशीसाठी एसीबी सज्ज आहे. मात्र, या आदेशाची फाईल एसीबीकडे यायला किमान एक आठवडा लागणार आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर चौकशीची व्यूहरचना (पध्दत) निश्चित केली जाईल. नेत्यांच्या चौकशीसोबतच अनेक घटकांचीही चौकशी करावी लागणार आहे. त्यासाठी वेगवेगळी चौकशी पथके (चमू) तयार करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला किमान १५ दिवस लागणार आहे. हे सर्व झाल्यानंतरच चौकशीला प्रारंभ करू, असे ते म्हणाले. चौकशीचे स्वरूप स्पष्ट करणे आताच योग्य होणार नसल्याचेही दीक्षित म्हणाले. (प्रतिनिधी)
एसीबी सज्ज मात्र, ...
By admin | Published: December 13, 2014 3:04 AM