लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.प्रेम प्रकरणात मुलीच्या वडिलांनी सदर तरुणाची तक्रार पोलिसात दिली होती. त्यामुळे हवालदार पाटीलने त्याला पोलीस ठाण्यात बोलावून बसून ठेवले. त्याच्यावर कारवाईचा धाक दाखवून संबंधित तरुणाच्या एका नातेवाईकाला तीन हजार रुपयाची पाटीलने लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. एसीबीच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या निरीक्षक भावना धुमाळे यांनी संबंधित व्यक्तीला अडीच हजार रुपयात लाचेचा सौदा पक्का करून हवालदार पाटीलकडे पाठवले. त्यानुसार शुक्रवारी रात्री ७.३० च्या सुमारास लाचेची रक्कम घेऊन संबंधित व्यक्ती पाटीलकडे गेला. पाटीलने बाजूला जाऊन लाचेची रक्कम स्वीकारताच पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या एसीबीच्या पथकाने हवालदार पाटीलच्या मुसक्या बांधल्या. वृत्त लिहिस्तोवर त्याच्याविरुद्ध कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:11 PM
लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
ठळक मुद्देअडीच हजारांची लाच : हवालदार जेरबंद