नागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी पुन्हा धाड घातली. यावेळी निवासस्थान परिसरात असलेल्या विविध कक्षाची एसीबीने कसून तपासणी केली. यावेळी १४ लाखांची रोकड आणि संस्थेतील गैरव्यवहार तसेच बेहिशेबी मालमत्तेची आणखी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे चौकशी पथकाच्या हाती लागली. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस धाडसत्र राबवून एसीबीने बजाज यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांहून १८ लाखांची रोकड, ४८८ ग्राम सोने आणि ५.८५ किलो चांदी ५५ लाखांच्या आलिशान कारसह ९ वाहने अशी अंदाजे पावणेतीन कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर शनिवारी जरीपटका पोलीस ठाण्यात डॉ. बजाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त कागदपत्रांच्या तपासणीतून मिळालेल्या संकेतामुळे मंगळवारी पुन्हा एसीबीच्या पथकाने डॉ. बजाज यांच्या निवासस्थानी धाड घातली. आजच्या झडतीत एसीबीच्या पथकाला सुमारे १४ लाखांची रोकड, संस्थेतील गैरव्यवहारावर उजेड टाकणारी कागदपत्रे आणि आणखी काही ठिकाणची मालमत्ता आढळल्याचे एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)भक्कम पुरावेमंगळवारी हाती लागलेले कागदपत्र म्हणजे डॉ. बजाज यांच्या गैरव्यवहाराचा भक्कम पुरावाच असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, डॉ. बजाज यांना अद्याप अटक झालेली नाही. मात्र, कोणत्याही वेळी बजाज यांना अटक केली जाऊ शकते, असे अधीक्षक राजीव जैन यांनी सांगितले.
एसीबीची बजाज यांच्याकडे धाड
By admin | Published: September 30, 2015 6:40 AM