जलालखेडा : जलालखेडा- पिंपळगाव (राऊत) रस्त्याच्या नालीचे खाेदकाम व मातीकाम दाेन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर मात्र निधीअभावी या रस्त्याचे बांधकाम रखडले हाेते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना गैरसाेयींचा सामना करावा लागत हाेता. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून या पांदण रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. या रस्त्यामुळे रहदारीचा मार्ग सुकर हाेणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जलालखेडा ते पिंपळगाव (राऊत) या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तीन काेटींचा निधी मंजूर करण्यात आला. माजी आ. आशीष देशमुख यांनी काटाेल, नरखेड तालुक्यात रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला हाेता. त्यानुसार जलालखेडा ते पिंपळगाव पांदण रस्त्याच्या नालीचे खोदकाम व मातीकाम दाेन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. त्यानंतर मात्र निधीअभावी या रस्त्याचे काम ठप्प हाेते. याबाबत शेतकऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनाद्वारे समस्या मांडली. गृहमंत्र्यांच्या निर्देशानुसार या रस्त्याच्या कामाला गती मिळाली असून, या रस्त्याचे सिडी वर्क पूर्ण झाले आहे. आगामी ३-४ महिन्यात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पूर्ण हाेईल, अशी माहिती कंत्राटदाराने दिली.
या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यास पिंपळगाव (राऊत) येथील नागरिकांना २४ किमीचा फेरा मारून जलालखेडा येण्याची गरज पडणार नाही. शिवाय या रस्त्यामुळे शेतकऱ्यांनाही साेईचे हाेणार आहे. या पांदण रस्त्याची रूंदी सारखी असणे गरजेचे आहे. परंतु काही ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
....
जलालखेडा ते पिंपळगाव (राऊत) या पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यात जिथे कुठे रस्ता अरुंद असेल, त्याची पाहणी करून मोजमाप केले जाईल.
- नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक याेजना.