लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार आवास योजना या सर्व योजनेतील प्रलंबित व अपूर्ण असलेल्या घरबांधणीला महा आवास अभियानांतर्गत गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत दिले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दीपक हेडाऊ, उपायुक्त विकास शाखा अंकुश केदार, सहायक विकास शाखा सुनील निकम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त कामगार विभाग राजदीप धुर्वे उपस्थित होते.
या ऑनलाईन कार्यशाळेत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यासह अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महा आवास अभियानांतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणांतर्गत अभियान राबवून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी, खासगी संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ग्रामीण भागातील घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यावर भर असणार आहे.
हे अभिययान २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १०० दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येईल. या अभियानात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे. घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना हप्त्यांचे वितरण करणे तसेच घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे व प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याचे नियोजन आहे.