लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध विकासकामांवर चर्चा झाली. २८४ किलोमीटर लांबीच्या वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढविण्यात यावी, अशी मागणी यावेळी दर्डा यांनी केली.
गडकरी यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान लक्षात घेता त्यांनी रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत व नवीन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी यासंबंधात चर्चा करावी, असे दर्डा यांनी म्हटले.
यवतमाळपर्यंत न्यावी ब्रॉड गेज मेट्रो
कॉरिडोर-१ अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नागपूर- वर्धा ब्रॉडगेज मेट्रोचा विस्तार यवतमाळपर्यंत करण्यात यावा, अशी मागणीदेखील विजय दर्डा यांनी यावेळी केली. वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ब्रॉडगेज मेट्रो चालविली जाऊ शकते, अशी भूमिका दर्डा यांनी मांडली.
रुग्णालयांना ऑक्सिजन प्लान्ट अनिवार्य करावा
शहरातील काही रुग्णालयांना नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लान्ट देण्यात आला आहे; परंतु शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट लावणे अनिवार्य करण्याची गरज आहे. सरकारने यासाठी आता धोरण निश्चित करावे, अशी मागणी दर्डा यांनी केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन किती आवश्यक आहे, हे सर्वांना पटले आहे. ज्या रुग्णालयांना कोरोनाकाळात सरकारकडून मदत करण्यात आली होती, त्यांच्याकडून गरीब व वंचितांना उपचार होत आहेत की नाही, याची चाचपणी व्हावी, असेदेखील दर्डा म्हणाले.