लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगातील पहिला वैज्ञानिक आणि संशोधक तथागत गौतम बुद्ध होत. तथागत बुद्धाच्या वैज्ञानिक तत्वज्ञानावर जगभर संशोधन सुरू आहे. विज्ञानावर आधारलेला ‘बुद्ध’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ च्या धम्मक्रांतीतून जगासमोर आणला. तोच खरा बुद्ध आहे, असा सूर रविभवन येथील सभागृहात आयोजित बुद्धमुर्ती दान वितरण सोहळ्यातून पुढे आला.भारतात बुध्द धम्म अधिक गतिमान करण्याकरीता व्हिएतनाम देशामधून ‘ली थू' यांच्याद्वारे तथागत भगवान गौतम बुध्दाच्या मूर्ती प्राप्त झाल्या. सोमवारी अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे बुध्दमुर्ती दान सोहळ्यात १११ बुद्धमुर्तीचे दान करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक, आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, इंजि. पी.एस. खोब्रागडे, प्रा. पुष्पा घोडके, विणा गायकवाड, नितीन गजभिये उपस्थित होते.यावेळी डॉ. भाऊ लोखंडे यांनी ‘बुद्ध' विचारातून झालेल्या क्रांतीवर विचार व्यक्त केले. बुद्ध ही जीवन जगण्याची कला असल्याचे त्यांनी सांगितले. बुद्ध तत्वज्ञान हे जगाला तारणारे असल्याचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने म्हणाले. अभिनेते गगन मलिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील बुद्ध धम्म हीच आजच्या जगाची मागणी असल्याचे सांगितले. जगात बुद्ध धम्माचे बीज पसरविणारे सम्राट अशोक होते. ८४ हजार बुद्ध विहारं त्यांनी उभारले. यानंतर बाबासाहेबांनी न भुतो न भविष्यती अशी धम्मक्रांती केली. जगातील प्रत्येक व्यक्ती आज तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसमोर नतमस्तक होत आहेत. बुद्ध विचारांचा प्रसाराची नवी यंत्रणा बाबासाहेबांच्या संकल्पनेतून स्वीकारावी असे सांगत डॉ. आंबेडकरांच्या नजरेतील बुद्ध धम्म स्वीकारावा,असा सूर यावेळी निघाला.प्रास्ताविक नितीन गजभिये यांनी केले. संचालन भीमराव फुसे यांनी केले. विणा गायकवाड यांनी आभार मानले.
विज्ञानावर आधारित बाबासाहेबांचा 'बुद्ध' स्वीकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:02 AM
विज्ञानावर आधारलेला ‘बुद्ध’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ च्या धम्मक्रांतीतून जगासमोर आणला. तोच खरा बुद्ध आहे, असा सूर रविभवन येथील सभागृहात आयोजित बुद्धमुर्ती दान वितरण सोहळ्यातून पुढे आला.
ठळक मुद्देनागपुरात १११ बुद्धमुर्तीचे वितरण