नागपूर : स्वत:ची अभिवृत्ती जाणून घेऊन आपण जसे आहात तसे स्वत:ला स्वीकारा तरच आनंदी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुरभी मित्रा यांनी केले. विशेष आयुष्य जगलेल्या व्यक्तींच्या आयुष्याची कहाणी त्यांच्याकडून थेट ऐकण्याची संधी देणाऱ्या 'मेरी कहानी, मेरी जुबानी' या रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या उपक्रमात त्या पुस्तक म्हणून बोलत होत्या.
डॉ. वसंतराव वांकर भवनात आयोजित कार्यक्रमास श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या आणि समलैंगिक समूहाच्या प्रतिनिधी म्हणून डॉक्टर मित्रा यांनी वैयक्तिक अनुभव सांगण्याबरोबरच एलजीबीटीक्यू आणि अन्य संरचनेतील शास्त्रीय माहिती सामाजिक व मानसिक दृष्टिकोनांतून स्पष्ट केली. मागील वर्षी झालेला डॉक्टर सुरभी मित्रा व त्यांच्या जीवनसाथी पारोमिता यांचा साखरपुडा हा संपूर्ण देशभरात गाजला होता. याबाबतही डॉ. मित्रा यांनी अनुभव कथन केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ. सुरभी यांनी समलिंगी व्यक्तींच्या मनोशारीर जडणघडणीवर शास्त्रीय पद्धतीने प्रकाश टाकला. एखादी व्यक्ती तृतीयपंथी का असते, एखादी गे वा लेस्बियन का असते, याची कारणे त्यांनी विशद केली. तर, दुसऱ्या सत्रात त्यांनी आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील वाटचालीबाबतचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. यात नवव्या वर्गात असताना आपल्याला जी जाणीव झाली, तिचा पुढचा प्रवास कसकसा होत गेला.. त्यातील अडथळे, अडचणी या सर्वांची माहिती दिली.
समलैंगिकता म्हणजे काय?
स्त्री-पुरुषांमधील समलैंगिकता व अन्य एलजीबीटी संरचनेतील अन्य प्रकार हे नैसर्गिक असतात. प्रत्येक व्यक्तीची लैंगिक ओढ ही भिन्न भिन्न असू शकते. ही भिन्नता समाजाने समजावून घेतली पाहिजे व स्वीकारली पाहिजे. समलिंगी ओढीचे दमन करणे मग ते सामाजिक दडपणे, कौटुंबिक असहकार्य, विविध वैद्यकीय व मानसिक प्रयोग या कशाही करिता असले तरी ते क्रूर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अशा दडपणामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य त्याच्या मनाविरुद्ध तर असतेच परंतु त्याच्या जीवनात येणाऱ्या विविध नाते सबंधानाही नाहक त्रास सोसावा लागतो. यासाठी भिन्न लैंगिक अभिव्यक्तीच्या पाल्यास सर्वप्रथम पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. कुठलेही फॅड अथवा फॅशन म्हणून व्यक्ती एलजीबीटीक्यू आदी समूहात जात नसतो. तर ती त्याला निसगार्ने व त्याच्या अंत:प्रवाहाने दिलेली हाक असते हे समजून त्यांच्या पाठीशी राहणे हे पालकांबरोबर समाजाचेही कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या.
स्त्री अथवा पुरुष याशिवाय स्वत:ची अन्य ओळख सांगणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना त्याला अपेक्षित संबोधन करावे. किंबहुना त्यास कुठले संबोधन आवडेल याची विचारणा करून त्यांच्याशी संवाद साधणे ही शिष्टाचाराला धरून असल्याचे त्या म्हणाल्या. भिन्न अभिवृत्तीच्या व्यक्तिमत्त्वांना माणूस म्हणून स्वीकारणे, सामाजिक दडपणामुळे कुटुंबालाही अवघड जाते. अशावेळी ही तात्पुरती विचार धारणा आहे यातून बाहेर पडण्याचे तांत्रिक व मांत्रिक उपाय आहेत असे म्हणून त्या व्यक्तीला समजावणे- धमकावणे, प्रसंगी मारहाण करणे शारीरिक व मानसिक ताण देणे अशा बाबी टाळणे महत्त्वाचे आहे.
अडचणी आणि आव्हान
लैंगिक अभिवृत्ति सोडता एलजीबीटीक्यू आणि अन्य समूहातील व्यक्ती सामान्यच आयुष्य जगत असते. ते करियर करतात, स्वत:चे कुटुंब जबाबदारीने सांभाळतात. सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील प्रत्येक आव्हानाला इतरांसारखेच सामोरे जातात, हे समजून घेण्याची गरज आहे. अशा व्यक्तिमत्वाना विसंगती समजून त्यांना समाजाच्या बाहेर ठेवणे अयोग्य असल्याचेही मत डॉ. सुरभी मित्रा यांनी व्यक्त केले.
तसेही समाजमान्य नसलेले आयुष्य जगणारी ही माणसे अनेक संकटांना पावलोपावली सामोरे जातच असतात याबाबत सांगताना डॉक्टर मित्रा यांनी स्वत:चेच उदाहरण दिले. त्या म्हणतात, समाजातील उच्चशिक्षित व्यावसायिक व प्रतिष्ठित कुटुंबातील घटक म्हणून मी समलैंगिक विवाहाचा घेतलेला निर्णय माझ्या कुटुंबीयांनी, मित्रांनी व व्यावसायिकांनी स्वीकारला असला तरी कायद्याच्या चौकटीत आम्हाला अनेक अडचणी आहेत. जसे आम्हाला विवाहाचे कायदेशीर प्रमाणपत्र मिळणे अवघड आहे. जीवनसाथी म्हणून विविध शासकीय नोंदी करणे यासही ही अद्याप कायदेशीररीत्या मान्य नाही. मूल जन्माला घालण्याचा पर्याय जरी आम्ही स्वीकारला तरी आमच्या अपत्याला समाजात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल हेसुद्धा आमच्यासाठी त्रासदायकच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अभिवृत्तीसह जगण्याचे स्वातंत्र्य
सर्वसामान्यांसारखे माणूस म्हणून जन्माला आलो असलो तरी स्वत:च्या अभिवृत्तीसह जगण्याचे स्वातंत्र्य आम्हा एलजीबीटीक्यू आणि अन्य समुदायास नाही. ही एकविसाव्या शतकातही खेदाची बाब आहे. यासाठी संवेदनशील समाजाने या समूहाचे एलाँँय म्हणजेच सहयोगी अशी भूमिका पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. याकार्यक्रमाचे संचालन रूबरूच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी केले तर आभार अॅड. मयुरी देशमुख यांनी केले. कार्यक्रमास अनेक समुपदेशक, डॉक्टर्स, वकील व्यावसायिकांसह नागपुरातील अभ्यासू मंडळी विशेषत्वाने उपस्थित होती.