नागपूर : साळ्यासाठी मुलगी बघून परत येत असताना उमरेड रोडवरील अड्याळ फाट्याजवळ शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ७ लोकांचा मृत्यू झाला, तर ४ वर्षीय बालकाचा केवळ हात फ्रॅक्चर झाला. मृतक ज्या तवेरा कारमध्ये बसले होते. त्या कारला समोरून येणाऱ्या अनियंत्रित टिपरने जोरदार धडक दिली. या घटनेमुळे जरीपटका येथील नजुल लेआऊटमध्ये शोककळा पसरली होती. दु:खाच्या सावटात मृतकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतकांमध्ये जरीपटका, नजुल ले-आऊट येथील आशिष विजय भुजाडे (वय ३३), स्नेहा आशिष भुजाडे (३०), अश्विन देविदास गेडाम (३१ रा. इंदोरा बाराखोली), सागर संपत शेंडे (पिवळी नदी), नरेश बाजीराव डोंगरे, मेघनाथ पांडुरंग पाटील ( रा. भीम चौक) व पद्माकर नत्थुजी भालेराव यांचा समावेश आहे. मृतकांच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नजुल ले-आऊट येथील रहिवासी व रेशन दुकानदार आशिष भुजाडे व त्यांची पत्नी स्नेहा नातेवाइकांना घेऊन साळ्यासाठी मुलगी बघायला पवनीला गेले होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आटोपून रात्री ते नागपूरकडे परतत होते. त्यांच्या तवेरा कार क्रमांक एमएच-४९सी-४३१५ चा वेगही बराच होता. अड्याळ फाट्याजवळील रामकुलर कारखान्यासमोर टिपर क्र. एमएच - ४०बीजी - ७७५७ च्या चालकाने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर मेडिकलमध्ये उपचारादरम्यान दोघांचा जीव गेला. भुजाडे दाम्पत्याचा ४ वर्षीय मुलगा दक्ष याचा हात फॅक्चर झाला.
- वैशालीनगर व नारा घाटावर अंत्यसंस्कार
शनिवारी दु:खाच्या सावटात भुजाडे दाम्पत्यावर व अश्विन गेडाम याच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर पद्माकर भालेराव यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी टिपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- भावंडांच्या डोक्यावरचे छत्र हरविले
मृतक आशिष व स्नेहा भुजाडे यांना दक्ष हा मुलगा व दोन मोठ्या मुली आहेत. दक्षची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी वैशाली घाटावर दक्ष अंत्यसंस्कारासाठी आला होता. आई-वडिलाचे त्याने अखेरचे दर्शन घेतले. लहानग्या दक्ष बरोबर त्याच्या दोन्ही बहिणी आई-वडिलांच्या प्रेमापासून पोरक्या झाल्या.