लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिखलाच्या ठिकाणी एलएडी आणि डीजेचे इलेक्ट्रीक कनेक्शन जोडत असताना जोरदार करंट लागल्याने पंकज दिगांबर सातपुते (वय ३५, रा. त्रिमूर्तीनगर, गुडधे ले-आऊट) यांचा करुण अंत झाला. कार्यक्रमस्थळी महापालिकेच्या मीटरचे कुलूप तोडून चोरीच्या विजेची जोडणी घेऊन सांस्कृतिक मंडळाने वीजचोरीसोबतच हलगर्जीपणा केल्यामुळेच पंकजचा जीव गेल्याने सक्करदरा पोलिसांनी कला संगम कला संस्कृती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.सक्करदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशीमबागेतील संत तुकाराम उद्यानात दिवाळी पहाट वारा या कार्यक्रमाचे सोमवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. कला संगम कला संस्कृती मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमस्थळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज मंडळाकडून रीतसर जोडणी घेण्याऐवजी महापालिकेच्या मीटरचे कुलूप तोडून वीजचोरी करीत थेट पुरवठा घेतला. तेथे डीजे आणि एलएडीचे इलेक्ट्रीक कनेक्शन जोडताना पंकज सातपुतेंना जोरदार विजेचा करंट लागला. त्यामुळे ते गंभीर झाले. तेथील मंडळींनी त्यांना उपचाराकरिता बाजूच्या खासगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी तपासून पंकज सातपुतेंना मृत घोषित केले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ निर्माण झाली. हर्षोल्हासाच्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात होती.विशेष म्हणजे, अनेक दिवसांपूर्वीच या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरल्याने सोमवारी सकाळी कार्यक्रमस्थळी चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे आयोजकांपैकी काही जणांनी कार्यक्रम रद्द करण्याचा विचार बोलून दाखविला. मात्र, सकाळी हलके उन्ह पडताच काहींनी कार्यक्रम घेण्याचा हट्ट धरला अन् तो पंकज सातपुतेंच्या जीवावर बेतला. सातपुते अत्यंत परिश्रमी होते. लहाणपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांना दोन भाऊ, आई सुशीला, पत्नी पल्लवी आणि दोन वर्षांचा लावण्य नावाचा मुलगा आहे. भल्या सकाळी ते वृत्तपत्र वितरण करायचे. इलेक्ट्रीशियन म्हणूनही ते काम करीत होते. त्यांच्या मृत्यूमुळे गुडधे ले-आऊट परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.सारेच बेकायदेशीर!पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आयोजकांनी सदर कार्यक्रमाकरिता महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज वितरण तसेच पोलीस विभागाकडून कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नाही. विजेच्या मीटर बॉक्सला थेट जोडणी घेतल्यानेच पंकजचा बळी गेल्याचे आणि त्याच्या मृत्यूला आयोजक जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्याने, सक्करदरा पोलिसांनी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील (वय ४५, रा. जयताळा) यांच्या तक्रारीवरून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला.
करंट लागल्यामुळे तरुणाचा करुण अंत : नागपुरात कार्यक्रमस्थळी घडला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:30 AM
चिखलाच्या ठिकाणी एलएडी आणि डीजेचे इलेक्ट्रीक कनेक्शन जोडत असताना जोरदार करंट लागल्याने पंकज दिगांबर सातपुते (वय ३५, रा. त्रिमूर्तीनगर, गुडधे ले-आऊट) यांचा करुण अंत झाला.
ठळक मुद्देसांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल