लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भरधाव कार उभ्या कंटनेरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा करुण अंत झाला. तर, त्यांचे तीन मित्र गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यांमध्ये येथील गुन्हे शाखेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमूख राजेंद्र निकम यांची मुलगी निशा (वय २४) हिचाही समावेश आहे.पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिस्लॉप कॉलेजचे विद्यार्थी निशा राजेंद्र निकम (२१), विशाल रथवानी (२१), सत्या सिंग (२०), दिव्या पकू (२१), धिरज पथाडे (२१), मैत्रेय आवळे (२२), शाहबाज जाफर अलवी (२२) आणि ईव्हाना परवीन खान (वय २२) अमरावतीकडे पार्टीसाठी गेले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास ते तिकडून अर्टिका कार (एमएच ४०/ एसी ९२०१) ने नागपूरकडे परत येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. धावत्या कारमध्ये ते गंमतजंमत करत येत होते. वडधामनाजवळच्या शहनाज हॉटेलसमोर अचानक भरधाव कार उभ्या कंटेनरवर आदळली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाची पुरती मोडतोड झाली आणि कारमध्ये बसलेले निशा, विशाल, सत्या, दिव्या तसेच धीरज हे पाच जण जागीच ठार झाले. तर, शाहबाज, ईव्हाना आणि मैत्रेय हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शाहबाज आणि ईव्हाना यांना मेडीट्रीना तर मैत्रेयला वाडीच्या वेलट्रीट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, २४ तास वर्दळीच्या महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगाच रांगा लागल्या त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.अपघाताची माहिती कळताच वाडीचे ठाणेदार नरेंद्र पवार आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहचले. निशा, विशाल, सत्या, दिव्या आणि धीरजला मेयोत नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळी जमलेली गर्दी दूर करून वाहतूक सुरळीत केली.मृत निशा निकम गुन्हे शाखेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमूख असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांची मुलगी होय. निकम हे कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच मोठ्या प्रमाणात निकम यांचे आप्तस्वकिय तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी अपघातस्थळी आणि मेयोत पोहचले. सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारीही घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींचीही भेट घेतली. वृत्त लिहस्तोवर मेयोत मृतांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी पोहचली होती. विविध महाविद्यालयातील तरुण आणि तरुणींनीही तेथे गर्दी केली. जीवाभावाचे मित्र अपघातात गेल्यामुळे त्यांचा प्रचंड आक्रोश सुरू होता.
नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 5:50 PM
नागपूर-अमरावती महामार्गावर एका कंटेनरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिका कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला.
ठळक मुद्देपोलीस निरीक्षक राजेंद्र नाईक यांच्या कन्येचा समावेश