नागपूर : ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला कथित अपघात होऊन दोन डब्यांची मोडतोड झाली. त्यामुळे एका डब्याला आग लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर १८ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता अजनी यार्डात अशा प्रकारचे वृत्त पसरले अन् रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येत सुरक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा पोहोचला आणि नंतर ही कथित दुर्घटना मॉकड्रिलचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधितांचा जीव भांड्यात पडला.
रेल्वेचा अपघात झाल्यास आणि अशी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास मध्य रेल्वेचा नागपूर विभाग किती तत्पर आहे, ते तपासण्यासाठी रेल्वे बोर्डाने मॉकड्रिलचे आदेश दिले होते. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय व्यवस्थापक ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी विजय कुमार पांडेय यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मॉकड्रिल घेण्यात आली. त्यानुसार, सकाळी ११ वाजता अजनी यार्डात ट्रेन नंबर १२१०१ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचा अपघात झाल्याने दोन बोगींना मोठे नुकसान झाले आणि त्यातील एका बोगीला आग लागल्याचे कळविण्यात आले. या अपघातात एकाचा मृत्यू तर १८ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी रेल्वे रस्क्यू टीम, एनडीआरएफ, सिव्हील डिफेन्सच्या टीम बोलावून घेण्यात आल्या. त्यांच्या मदतीला अग्निशमन दलाचे जवानही होते. त्यांनी आग विझवून मृत तसेच जखमींना बाहेर काढून ईस्पितळात पोहोचवले.
अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ
घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले त्यांनी कथित अपघातात सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. मृत तसेच जखमींच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदतही तातडीने देण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी १२ या तासाभरात घेण्यात आलेल्या या मॉकड्रिलमध्ये रेल्वेच्या २३ अधिकारी, २७५ कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, रेल्वे यार्डात अपघात झाल्याच्या वृत्ताने अजनी परिसरात काही वेळेसाठी खळबळ निर्माण झाली होती.