एक गंभीर जखमी : खापरीत उभ्या ट्रकवर आदळली कारनागपूर : रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकवर भरधाव कार आदळल्याने कारमधील चार अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला तर, एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास नागपूर-वर्धा महामार्गावरील खापरी गावाजवळ हा भीषण अपघात घडला.चालक ट्रक घेऊन पळाला चार मित्रांचा अपघाती मृत्यूनागपूर : सोनेगाव पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतापनगरातील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेले आठ ते दहा अभियंते दोन दिवसांची सुटी असल्यामुळे बाहेर फिरायला गेले होते. रविवारी पहाटे एका ढाब्यावर जेवण घेतल्यानंतर ते नागपूरला दोन कारमधून परत येत होते. दोन्ही कार फारच वेगात होत्या. खापरीजवळून पुढची कार निघून गेल्यानंतर मागून आलेली निस्सान मायक्रा कार (एमएच ४०/ एआर ४२८८) महामार्गाच्या कडेला उभा असलेल्या ट्रकवर आदळली. कार खूपच वेगात होती. त्यामुळे कारचा समोरचा भाग ट्रकच्या मागच्या भागाखाली शिरला अन् कार पुरती फसल्यामुळे आतमध्ये बसलेल्यांपैकी अजय चंदरपाल कुशवाह (वय २८, रा. गिट्टीखदान), सय्यद उबेद झिशान (वय २४, रा.स्वागतनगर, कोतवाल डूंगा), सागर गणेशराव सुरजुसे (वय २६, रा. गांधीनगर पुसद, जि. यवतमाळ) आणि आकाश वेदमाणिकन जॉर्ज (वय २५, रा. बुटीबोरी) हे चार जण जागीच ठार झाले. तर, आमिर शरिबुल खान (वय २८, रा. मोमिनपुरा) हा गंभीर जखमी आहे. या भीषण अपघाताची माहिती महामार्गाने जाणाऱ्यांपैकी काहींनी पोलिसांना दिली. त्यावरून खापरी चौकी तसेच सोनेगाव ठाण्याचा ताफा घटनास्थळी पोहचला. तत्पूर्वीच चालकाने घटनास्थळावरून ट्रक घेऊन पळ काढला होता. कारची पुरती मोडतोड झाल्यामुळे आतमधील तरुणांना काढण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले. चार तरुणांना कसेबसे बाहेर काढले. त्यातील आमिर खान जिवंत होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. एकाचे धड आणि शीर वेगळे झाले होते. तो कारमध्ये पुरता फसला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी कटरच्या साहाय्याने कारचा बराचसा भाग कापला आणि मृतदेह बाहेर काढला. (प्रतिनिधी)प्रचंड थरारअपघाताच्या भीषणतेने घटनास्थळी प्रचंड थरार निर्माण केला होता. चारही मृत तरुण तसेच गंभीर जखमी असलेला आमिर खास मित्र होते. ही कार आकाश जॉर्जच्या मालकीची होती अन् तोच ती चालवत होता. अपघाताची भीषणता ध्यानात घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त ईशू सिंधू, उपायुक्त दीपाली मासिरकर, सहायक आयुक्त शेखर तोरे, सोनेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप ताफ्यासह घटनास्थळी पोहचले होते. मृतदेह मेडिकलला पोहचविल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. मेडिकलमध्ये त्यांचा आक्रोश अनेकांच्या काळजाचे पाणी करणारा होता.
चार मित्रांचा अपघाती मृत्यू
By admin | Published: February 08, 2016 3:09 AM