लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मुंबईहून गावी परतल्यानंतर बहिणीच्या भेटीला निघालेल्या काटोलच्या एका तरुणाचा सदर उड्डाणपुलवर अपघात घडला. त्याची दुचाकी घसरून तो पुलाच्या खाली पडल्याने त्याचा करुण अंत झाला. गुरुवारी रात्री हा अपघात घडला.
जीवन माणिकराव जुमनाके (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंबईत एका कंपनीत मोठ्या हुद्दयावर काम करायचा. गुरुवारी सकाळच्या विमानाने तो नागपुरात आला. येथून मुळ गावी काटोलला गेला. दिवसभर कुटुंबीयांसोबत घालवल्यानंतर तो त्याच्या दुचाकीने नागपुरला निघाला. जीवनची बहिण भावना उईके अजनी रेल्वे वसाहतीत राहते. तिला भेटण्यासाठी जीवन त्याच्या दुचाकीने सदर उड्डाणपुलावरून गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास जात होता. ऑटो स्टॅण्डच्या वळणावर जीवनची अनियंत्रीत दुचाकी पुलावरच्या कठड्याला धडकली आणि दुचाकीवरून उसळून जीवन पुलाच्या खाली एका कारवर आदळला. मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. नंतर अनेकांनी जखमी जीवनकडे धाव घेतली. माहिती कळताच सदरचे ठाणेदार विनोद चाैधरी यांनीही आपल्या सहकाऱ्यांना पाठविले. जखमी जीवनला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
----
पुल बनला धोक्याचा
वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी बनविण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे वळण जीवघेणे ठरले आहे. या वळणावर कोणताही दिशादर्शक नाही किंवा धोक्याचे संकेत देणारे रिफ्लेक्टर नाही. डायव्हरशनचेही संकेत नाही. त्यामुळे पाऊस सुरू असल्यास वाहनचालकांना वळण लक्षात येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असल्याचे पोलीस सांगतात. बहिणीच्या भेटीला निघालेल्या जीवनचाही असाच अपघात झाला. विशेष म्हणजे, तो हेल्मेट घालून होता. मात्र, हेल्मेटचे हूक व्यवस्थीत न लावल्यामुळे हेल्मेट बाजुला पडले अन् त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जीव गेला.
----