लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानात अचानक बिघाड आल्याने बुधवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातच ठेवण्यात आले. दरम्यान बुधवारी पहाटे ७ वाजताच्या दरम्यान सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने सिंगापूरकडे रवाना केले.मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईट ६ ई १९ हे विमान मंगळवारी रात्री १.३५ वाजता मुंबईहून सिंगापूरसाठी रवाना झाले. विमानाने उडाण घेतल्यानंतर चालकदलाला विमानात काहीतरी बिघाड असल्याची जाणीव झाली. चालक दलाने नागपूर एटीसीकडे इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली व ती मिळाल्यानंतर बुधवारी पहाटे ३.३० वाजता हे विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सूत्राच्या माहितीनुसार विमान उतरविल्यानंतर येथील प्रवाशांना टर्मिनल बिल्डींगमध्ये आणण्यात आले नाही. प्रवाशांना विमानातच थांबविण्यात आले. त्यानंतर विमान कंपनीद्वारे हैदराबादहून रिकामे विमान बोलविण्यात आले. पहाटे ६.३० वाजताच्या दरम्यान सर्व प्रवाशांना खराब विमानातून आलेल्या विमानात बसविण्यात आले व ७ वाजता फ्लाईट सिंगापूरकडे रवाना करण्यात आली. बिघडलेल्या विमानाची सायंकाळपर्यंत दुरुस्ती होऊ शकली नसल्याने ते विमानतळावर उभे होते. विमानाबाबत माहितीसाठी इंडिगो एअरलाईन्सशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून माहिती मिळू शकली नाही.जी-९ आता आठवड्यातून दोनदाएअर अरेबियाच्या नागपूर-शारजाह-नागपूर फ्लाईटच्या शेड्युलमध्य १ जानेवारीपासून बदल करण्यात आला आहे. फ्लाईट जी ९-४१५ आता शुक्रवार आणि रविवार अशी आठवड्यातून दोनदा करण्यात आली आहे. मात्र विमानाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला नाही. हे विमान रात्री ३.४५ ला नागपूर विमानतळावर पोहचेल आणि पहाटे ४.४५ वाजता शारजाहसाठी रवाना होईल. ही फ्लाईट आतापर्यंत मंगळवार, बुधवार व शुक्रवारी संचालित करण्यात येत होती.
सिंगापूरला जाणाऱ्या विमानाचे नागपुरात आकस्मिक लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:51 AM
मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानात अचानक बिघाड आल्याने बुधवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
ठळक मुद्देप्रवाशांचा रात्री विमानातच मुक्काम :सायंकाळपर्यंत झाली नाही दुरुस्ती