लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना ३३ लाख २८ हजार ९० एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली आहे.वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना वैयाक्तिक व सामूहिक वनहक्क मिळवण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या कायद्यानुसार २०१९अखेरपर्यंत अंतिमरीत्या १ लाख ९० हजार ७३७ इतके वैयक्तिक व सामूहिक वन हक्क दावे मान्य करण्यात आले. प्रलंबित असलेले वन हक्क दावे व अपिले यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत विशेष ‘वनमित्र मोहीम’ राबवण्यात आली. यामुळे जमिनीचे हक्क मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे.सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या ७ हजार ७५६ गावांपैकी ३५६ गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे स्वयंसेवी संस्थांमार्फत तयार करण्यात येत आहेत. उर्वरीत गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामूहिक वनहक्क व्यवस्थापन पदविका’ अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना ३३ लाख एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 8:02 PM