नागपूर : महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीतदेखील अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील चार वर्षांत महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये महिला अत्याचारात वाढ दिसून आली. दुर्दैवाची बाब म्हणजे महिला अत्याचार दरात नागपूरचा राज्यात पहिला व देशात चौथा क्रमांक आहे. सर्वसामान्य गुन्ह्यांप्रमाणेच महिला अत्याचारातदेखील नागपूर राज्याची क्राइम कॅपिटल असल्याचे चित्र आहे. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो) आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०२१ मध्ये नागपुरात १८ वर्षांहून अधिक वयाच्या ११५ महिलांवर अत्याचार करण्यात आले. महिला अत्याचाराचा दर ९.४ इतका होता. मुंबई, पुण्याचा हाच दर दरहजारी ४.३ व ४.० इतका होता. महिला अत्याचाराच्या दरात नागपूरचा देशात चौथा व राज्यात पहिला क्रमांक आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यातदेखील सर्वाधिक दर
महिला अत्याचाराप्रमाणेच महिलांशी संबंधित एकूण गुन्ह्यांमध्येदेखील नागपूरचा दर राज्यात सर्वात जास्त असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. नागपुरात २०२१ साली महिलांशी संबंधित १ हजार १५६ गुन्हे नोंदविल्या गेले व दर हजारी दर ९४.६ इतका होता. मुंबईत हाच दर ६५.१ व पुण्यात ६७.६ इतका होता. देशातील दराची तुलना केली तर लखनौ, दिल्ली, जयपूर, इंदूरनंतर नागपूरचा क्रमांक लागतो.
महिलांविरोधातील संबंधित एकूण गुन्हे
वर्ष : गुन्हे
२०१९ : १,१४४
२०२० : ९२०
२०२१ : १,१५६
अत्याचाराचा दर
शहर : दर (दर हजारी)
नागपूर : ९.४
मुंबई : ४.३
पुणे : ४.०
अपहरणाचा दर
शहर : दर (दर हजारी)
नागपूर : २७.४
मुंबई : १२.९
पुणे : २१.६
सात महिन्यांत १६३ अत्याचार
जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीत नागपुरात १६३ महिला अत्याचाराच्या प्रकरणांची नोंद झाली. खेळण्या-बागडण्याच्या वयातील लेकींवरदेखील हिंस्र मनोवृत्तीच्या नराधमांची नजर पडत आहे. महिला व मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे बहुतांश नराधम हे अनोळखी व्यक्ती नसून, नातेसंबंध अन् नेहमीच्या परिचयातीलच आहेत. एकूण प्रकरणांपैकी १६० प्रकरणांत आरोपी ओळखीतील व्यक्तीच आहेत.
लग्नाचे आमिष दाखवत ५५ प्रकरणांत महिला-मुलींवर अत्याचार करण्यात आले, तर मैत्री-प्रेम संबंधांवरून ७२ प्रकरणांत अत्याचार झाले. ३३ प्रकरणांत नातेवाईकच आरोपी निघाले. केवळ तीन प्रकरणात आरोपी अज्ञात होते.
महिला अत्याचारात पहिली पाच शहरे
क्रमांक : शहर
१ : जयपूर
२ : दिल्ली
३ : इंदूर
४ : नागपूर
५: लखनौ