लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवनी वाघिणीने १३ लोकांचा जीव घेतला होता. वाघाच्या हल्ल्यात लोकांचा जीव जात असल्याचे लक्षात घेऊन तिला पकडणे गरजेचे होते. पण तिला पकडण्यात वन विभागाला यश आले नाही. त्यामुळे तिला गोळी मारून ठार करावे लागले. हा निर्णय घेताना वाघिणीने केलेला आतंक व त्यामागची गंभीरता लक्षात घेतली गेली, असे मत माजी खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केले.रविवारी प्रेस क्लबद्वारे नागपुरात आयोजित ‘टी-१ वाघिणीची हत्या’ या विषयावर आयोजित चर्चेत ते बोलत होते. ते म्हणाले की, पर्यावरणासाठी वाघ व वन्यप्राणीही गरजेचे आहे. पण मानवाचा जीव वाचविणे हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. वन्यप्राणी व वाघांना सीमेमध्ये बांधता येत नाही. त्याचा अभाव असल्याचे ते म्हणाले. या चर्चेत माजी वन व सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, किशोर तिवारी, वन्यजीव तज्ज्ञ किशोर रिठे, वरिष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, जोसेफ राव, ब्रह्माशंकर त्रिपाठी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबीयांचे सदस्यसुद्धा उपस्थित होते.मोघे म्हणाले की, आदिवासींनीच जंगलाचे संरक्षण केले आहे. ते वाघांवरही प्रेम करतात. पण एकदा वाघाच्या तोंडाला मानवाचे रक्त लागले की पुढे परिस्थिती कठीण होते. त्यामुळे कुठल्याही वनक्षेत्राच्या परिसरात पहिलीच घटना घडल्यानंतर त्या वाघाला पकडणे आवश्यक आहे. वन्यजीव तज्ज्ञ किशोर रिठे म्हणाले की, काही वाघांना मारून विषय संपत असेल तर काहीच हरकत नाही, पण समस्या लॅण्डस्केपची आहे. सर्वांनीच या समस्येवर बसून निर्णय घेतला पाहिजे. ते म्हणाले की, २० वर्षांपूर्वी आम्हाला वाघ बघण्यासाठी कान्हा जावे लागत होते. सर्वात पहिले १९९९ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन करण्यात आले. २०१२ मध्ये टिपेश्वरमध्ये वाघ दिसत नव्हता. पण टिपेश्वर व मारेगावाचे पुनर्वसन केल्यानंतर वाघ दिसायला लागले. व्याघ्र प्रकल्प व संरक्षित क्षेत्र वाढल्याने वाघ वाढले.ताडोबातून वाघ उमरेडपर्यंत येत असल्याने उमरेड-कºहांडला अभयारण्य घोषित करण्यात आले. आम्हाला विदर्भातील शेतकऱ्यांना मारून वाघ वाचवायचे नाही. परंतु अवनीच्या प्रकरणात खासगी शूटर आणणे योग्य नव्हते.राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए)ने वाघ ट्रॅँक्यूलाईज करण्यासाठी तयार एसओपीमध्ये खासगी शूटरला सहभागी करून न घेण्याचा नियम बनवायला हवा.किशोर तिवारी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने वाघिणीला पकडण्यासाठी वन विभागाला आपले तंत्रज्ञान व ट्रॅँक्यूलाईज होऊ न शकल्यास मारण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या निर्णयाशी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कुठलाही संबंध नव्हता. या प्रकरणात राजकीय पक्ष उगाच त्यांना टार्गेटकरीत आहे.
ग्रामीण जनतेत होती दहशतराळेगाव वनक्षेत्राशी लागून असलेल्या सखी कृष्णापूरचे अशोक केवटे म्हणाले की, १५ किमी क्षेत्र बोराटी, सराटी, सखी, खैरगाव येथे वाघिणीच्या हल्ल्याच्या १३ घटना घडल्या. त्यांचे शेत जंगलाशी लागून असल्याने वाघांचा त्यांच्या शेतातून वावर होता. यातील केवळ तीन घटना जंगलात घडल्या तर १० घटना शेतात काम करीत असताना घडल्या. वाघिणीच्या हल्ल्यात ११ युवक मारल्या गेले. परंतु कुठलाही अधिकारी व वन्यजीवप्रेमी त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था जाणून घेण्यास आला नाही. परिसंवादामध्ये वन्यजीव प्रेमी डॉ. अविनाश बनाईत व डॉ. जेरिल बनाईत सहभागी झाले होते.