लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसी येथील एसएस कंपनीच्या सहायक लेखापालाने कार्यालयातील आलमारीतून ३.५० लाख रुपयांचा चेक चोरून दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा केला. त्यातील २० हजार रुपयांची रक्कम स्वत: काढून कंपनीच्या मालकाची फसवणूक केली. या प्रकरणातील आरोपीचे नाव गणेश कदम (३० रा. राय टाऊन) आहे. तक्रारकर्ते भाऊसाहेब सुर्वेनगर येथील एकनाथ पुरोहित (५०) आहे. पुरोहित यांची एमआयडीसीमध्ये एसएस कंपनी आहे. तिथे गणेश सहायक लेखापाल म्हणून काम करीत होता. पुरोहित यांचा एमआयडीसी येथील पीएनबी बँकेतून आर्थिक व्यवहार होतो. काही दिवसांपूर्वी पुरोहित यांनी ३.५० लाख रुपयांचा चेक सही करून आलमारीत ठेवला होता. आरोपी गणेश याने तो चेक दिनेश आगीलावे यांच्या खात्यात आरटीजीएस केला. त्यातून २० हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. आरोपींनी आपला फोन बंद करून ठेवला. हे पुरोहित यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन विचारणा केली. त्यांनी संबंधित खात्यात रक्कम ट्रान्सफर थांबविली. परंतु तोपर्यंत आरोपीने २० हजार रुपये काढून घेतले होते. पुरोहित यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात लेखापालाने केली २० हजार रुपयांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:05 PM