नागपूर : तत्त्वज्ञान, संशोधन, सौंदर्यशास्त्र, इतिहास अशा कितीतरी साहित्य प्रकारांनी भारत संपन्न आहे. मात्र, त्यांचे लिखित संकलन करण्याची वृत्ती नसल्याने म्हणा वा कुणाचे लिखित दस्तावेज संवर्धित करण्यासंदर्भात उदासीनता असल्याने, आपण आपल्या साहित्य संपदेपासून अलिप्त राहिलो आहोत. आज जे प्राचीन भारतीय लिखित दस्तावेज उपलब्ध आहेत, ते एकूण दस्तावेजाच्या धड १० टक्केही नसल्याचे सांगितले जाते. यावरून आपणा भारतीयांच्या साहित्य संवर्धनासंदर्भातील कफल्लक वृत्तीची कल्पना येते. हीच वृत्ती आजही असल्याने, बऱ्याच लेखकांनी केलेले संशोधन, लिहिलेले नाट्य, काव्य, कथा अडगळीत पडल्या आहेत. हे सगळे साहित्य लेखकाच्या मृत्यूसवे चिताग्नीवर अदृश्य होणार आहे.
जगात अभिव्यक्तीला दुष्काळ नाही. मात्र, ज्या तऱ्हेचे प्रेम आपल्या साहित्यावर जगातील काही देशांचे दिसून येते, तसे आपल्याकडे नाही हे दुर्दैव आहे. त्याचाच परिणाम अभिव्यक्तीला कुठलीच मर्यादा नसली तरी लेखक वाचकांपर्यंत पोहोचण्याला लगाम आहे. मुळात ही लेखक व ग्रंथ प्रकाशक यांच्यातील भल्यामोठ्या अंतराची समस्या आहे. त्यातही काळाच्या ओघात आणि व्यावसायिकतेच्या जोखडात प्रकाशकांना अनेक अडचणी आहेत. लेखक हा मुळात मनस्वी असल्याने आणि ग्रंथ प्रकाशन ही आर्थिक बाब असल्याने स्थळ, काळ, परिस्थितीनुसार तो धजावत नाही. त्यातच साहित्यासंदर्भातील शासकीय संस्था, विभाग, शासन अनुदानित संघटना, महामंडळे खुर्ची तोडण्याचेच काम करतात. त्याचा परिणाम पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक उदासीन वृत्तीचीच पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येते. वर्तमानात प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेली साहित्य निर्मिती अडगळीत आहे. दुर्लक्षित अवशेषांचे रडगाणेच त्या संहितांच्या नशिबी आहे. संहितांचा जन्मदाता सरणावर जाणार तेव्हा त्या संहिता अनाहुत भस्म होणार आहेत.
* तुम्ही यावे आमच्या दारी
शासनाकडून साहित्य प्रकाशनाबाबत अनुदान दिले जाते. कामगार कल्याण मंडळ, साहित्य महामंडळ, मराठी-हिंदी भाषा विभाग अशा अनेक संस्थांद्वारे हे अनुदान साहित्य प्रकाशनासंदर्भात मिळते. मात्र, या संस्थांची पोहोच अजूनही तळागाळात नाही, हे वास्तव आहे. या संस्था, मंडळांवर असणारे पदाधिकारी स्वत:च्याच आविर्भावात असतात. ग्रामीण, नवोदित लेखकांकडे ते तुसड्या भावनेनेच बघतात. या संस्था, मंडळे त्यांना ‘तुम्ही यावे आमच्या दारी, तुम्ही नसतेच कारभारी’ अशा तऱ्हेने वागवत असतात. त्यामुळे, उपेक्षित लेखक त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत.
* संस्थांकडेही संहिता धूळखात
संस्था, मंडळांकडून दरवर्षी साहित्य निर्मितीबाबत स्पर्धांचे आयोजन होत केले जाते. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात नाट्य, काव्य, कथा आदींच्या संहिता जमा होतात. स्पर्धा आटोपली, पुरस्कारांचे वाटप झाले की त्या सर्व संहिता धूळखात पडल्या असतात. किमान त्या संहितांच्या प्रकाशनाबाबत पुढाकार घेण्याची वृत्ती त्यांची नसते.
.........