हायकोर्ट : दोन आठवड्यात सोडण्याचे निर्देश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा (फर्लो) मंजूर केली. तसेच, त्याला दोन आठवड्यात सोडण्याचे निर्देश शासनाला दिले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. गवळीने संचित रजेसाठी सुरुवातीला कारागृह उपमहानिरीक्षकाकडे अर्ज सादर केला होता. त्यावेळी निवडणुकीचे दिवस होते. परिणामी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, ते अपील प्रलंबित आहे. गवळीला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. गवळीतर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर व अॅड. मीर नगमान अली तर, शासनातर्फे मुख्य वकील भारती डांगरे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)
कुख्यात अरुण गवळीला संचित रजा
By admin | Published: April 27, 2017 2:00 AM