लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वस्तीतील १५ वर्षीय युवतीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक आरोपी तपास अधिकाऱ्याच्या निगराणीतून फरार झाल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यात घडली आहे. यामुळे अजनी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.दीपांशू विरुळकर (२०) रा. सावरबांधे सभागृहाजवळ, हुडकेश्वर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरला अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय मुलगी शाळेत गेली होती. दीपांशूने मुलीच्या आजीचा मृत्यू झाल्याचे सांगून तिला शाळेतून सोबत नेऊन तिचे अपहरण केले. दोन दिवस होऊनही मुलगी घरी न आल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी ११ सप्टेंबरला अजनी पोलिसात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीला घेऊन दीपांशू गुजरातला गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर ते नाशिक, पुणे, मुंबईत राहिले. ६ ऑक्टोबरला ते नागपुरात आले. रविवारी रात्री ते कोराडी मंदिरात दर्शनासाठी गेले असता अजनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. दीपांशूला पोलीस कोठडीत ठेवून मुलीला कुटुंबीयांसोबत घरी पाठविले. सोमवारी दुपारी तपास अधिकारी सहायक उपनिरीक्षक डेहनकर यांनी दीपांशूला चौकशीसाठी बाहेर काढले असता चौकशी सुरू असताना दुपारी ४.४५ वाजता लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने दीपांशू फरार झाला. त्याचा शोध घेऊनही तो कुठेच आढळला नाही. आरोपी फरार झाल्यानंतर अजनी पोलीस आरोपीला अटकच केली नसल्याचे सांगत असून त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती देत आहेत. दोन महिन्यापूर्वीही अजनी पोलीस कोठडीतून आरोपी पळून गेला होता.
नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यातून आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 11:49 PM