लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोव्यातून नागपुरात आणताना धावत्या ट्रेनमधून पळून गेलेल्या रितिक राकेश शुक्ला (वय २०) नामक आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी लखनौला अटक करून नागपुरात आणले आहे.आरोपी रितिक फ्लिपकार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याने ग्राहकांकडे पोहोचविलेली रक्कम कंपनीच्या कार्यालयात पोहोचविण्याऐवजी स्वत: हडपली. हा प्रकार उघड झाल्यानंतर रितिकविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्पूर्वी आरोपी रितिक फरार झाला होता. तो गोव्यात असल्याची कुणकुण लागताच गिट्टीखदान पोलिसांनी गोवा गाठून रितिकला ताब्यात घेतले. त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे पोलीस पथक २३ ऑगस्ट २०१८ ला नागपूरकडे घेऊन येत होते. मात्र, पोलिसांची नजर चुकवून आरोपी रितिक बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरजवळून पळून गेला. याप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून गिट्टीखदान पोलीस त्याचा शोध घेत होते. तो लखनौ(उत्तर प्रदेश)मध्ये दडून असल्याची माहिती कळताच गिट्टीखदानचा पोलीस ताफा तिकडे पोहोचला. रितिकला अटक करून त्याला नागपुरात आणण्यात आले. ही कामगिरी गिट्टीखदानचे ठाणेदार सतीश गुरव यांच्या नेतृत्वात एएसआय राजेश लोही, नीलेश इंगोले, वैभव कुळसंगे, विक्रम ठाकूर आणि आनंद केंद्रे यांनी बजावली.
पोलिसांना चकमा देऊन पळालेला आरोपी लखनौला जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:42 AM
गोव्यातून नागपुरात आणताना धावत्या ट्रेनमधून पळून गेलेल्या रितिक राकेश शुक्ला (वय २०) नामक आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी लखनौला अटक करून नागपुरात आणले आहे.
ठळक मुद्देगिट्टीखदान पोलिसांची कारवाई : सात महिन्यांपूर्वी ट्रेनमधून पळाला होता