नागपूर : संशय आल्यामुळे कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारचालकाने कार जोराने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु हुडकेश्वर पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीस पकडले. आरोपीच्या ताब्यातून घातक शस्त्र आणि गांजा जप्त करून त्यास अटक करण्यात आली आहे.
आशिष राजेश चौरसिया (वय ३४, रा. श्रीकृष्णनगर, हुडकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी कार चालकाचे नाव आहे. शनिवारी २० मे रोजी सायंकाळी पाच वाजता हुडकेश्वर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यांना श्रीकृष्णनगर परिसरात एक कार संशयास्पद परिस्थितीत फिरताना दिसली. पोलिसांनी त्या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने कार जोरात पळविली. पोलिसांनी पाठलाग करून श्रीकृष्णनगर येथील नाल्यासमोर कार थांबविली.
पोलिसांनी कारची झडती घेतली असता गाडीच्या आत समोरील सीटवरील एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीचा उग्र वास येत असल्याने पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात १४२ ग्रॅम गांजा आढळला. आरोपीच्या कारची झडती घेतली असता त्यात दोन लोखंडी सत्तुर, एक लोखंडी गुप्ती, एक धारदार चाकू, दोन मोबाईल व टाटा इंडिगो गाडी क्रमांक एम. एच. ०१, सी. जे-३७८१ असा एकुण १ लाख ६५ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्धकलम ८ क, २० ब, एनडीपीएस अॅक्ट ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्र राजपुत, निरीक्षक (गुन्हे) विक्रांत सगणे, उपनिरीक्षक रिना मिसाळ, उपनिरीक्षक महामुनी आणि पथकाने केली.