योगेश पांडे
नागपूर : दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यातील एका आरोपीने पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला. अगोदर त्याने लॉकअपच्या रॉडवर डोके आपटले व नंतर वस्तऱ्याने पोटावर वार करून घेतले. लकडगंज पोलीस ठाण्यात मंगळवारी झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रुपेश नंदकिशोर पांडे (३०, शांतीनगर) व प्रदीप थापा (४२, शांतीनगर) हे सोमवारी रात्रीच्या सुमारास जुना मोटारस्टँड चौकातील कार्निव्हल वाईन शॉपच्या मागील गल्लीत दारूच्या नशेत गोंधळ घालत होते. परिसरातील नागरिकांना ते शिवीगाळ करीत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व लकडगंज पोलीस ठाण्यात आणले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात पाठविण्यात येत असताना रुपेश पांडेने लॉकअपजवळील पिलरला तसेच रॉडवर डोके आपटले. मेयोतील तपासणीनंतर दोघांनाही मध्यरात्री दीड वाजता परत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर प्रदीप थापा याने ‘मी खुनाचा आरोपी असून, तुम्हाला पाहून घेईन,’ या शब्दांत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
दोघेही आरोपी दारूच्या नशेत शिवीगाळ करून गोंधळ घालत होते. पोलीस ठाण्यातच हा प्रकार सुरू असल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले. रुपेश पांडे याला ड्युटी रायटरच्या खोलीत बसविण्यात आले असता त्याने पँटच्या खिशातून वस्तरा काढत स्वत:च्या पोटावर वार करून घेतले. ‘माझ्यावर तुम्ही कारवाई करत आहात, मग मी स्वत:ला संपवतो,’ असे म्हणत तो वार करून घेत होता. पोलिसांनी धाव घेत त्याच्या हातातून वस्तरा हिसकावला, परंतु त्याच्या पोटातून रक्त येत होते. त्याला पोलिसांनी तातडीने मेयो इस्पितळात रवाना केले व त्याच्यावर तिथे उपचार झाले. दरम्यान, या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात खळबळ माजली होती.
आरोपीची प्रकृती धोक्याबाहेर
पांडेने स्वत:वर वार करून घेतल्यावर त्याच्या पोटातून रक्त येऊ लागले. हे पाहून उपस्थित पोलीस कर्मचारी लगेच त्याला मेयो इस्पितळात घेऊन गेले. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील देण्यात आली. वस्तऱ्याला धारदार ब्लेड नसल्याने जास्त खोल जखम झाली नाही. त्याच्यावर उपचार झाल्यावर त्याच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. उपचारानंतर त्याला परत लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.