नागपूर : घरफोडी आणि वाहन चोरी करीत असलेल्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मानकापूर पोलिसांचे तपास पथक सोमवारी रात्री वाहन चोरी व घरफोडीच्या आरोपीला शोधत होते. गस्त घालत असताना पोलीस शिपाई अजय पाटील यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी भागीरथ जंगलू गेडाम (२१) रा. बैरामजी टाऊन, खदान, सदर यास अटक करण्यात आली. त्याने दोन महिन्यापूर्वी रतननगर, मानकापूर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांना वर्षा धर्मेंद्र चौधरी (४६) रा. रतननगर यांनी चोरीची तक्रार दिल्याची माहिती मिळाली. आरोपीची आणखी चौकशी केली असता, त्याने शहरात पाच ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीकडून १ लाख ९० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपायुक्त विनीता साहू, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक कैलास मगर, रवींद्र भुजाडे, अंकुश राठोड, अजय पाटील, रोशन वाडीभस्मे यांनी केली.
..............