आरोपीला केवळ तत्त्वज्ञानाधारे दोषी ठरवले जाऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:30 AM2018-11-24T00:30:36+5:302018-11-24T00:30:56+5:30

कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणामध्ये दिला.

The accused can not be held guilty only by philosophy | आरोपीला केवळ तत्त्वज्ञानाधारे दोषी ठरवले जाऊ शकत नाही

आरोपीला केवळ तत्त्वज्ञानाधारे दोषी ठरवले जाऊ शकत नाही

Next
ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायद्यातील केवळ एखाद्या सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्याकरिता आरोपीविरुद्ध ठोस व विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणामध्ये दिला.
मृत्यूच्या दारावर असताना कुणी खोटे बोलणार नाही असे तत्त्वज्ञान कायद्यात आहे. मृत्यूपूर्व बयान स्वीकार करण्यासाठी हे तत्त्वज्ञान लागू आहे. त्यामुळे चंद्रपूर सत्र न्यायालयाने विविध त्रुटी असणाऱ्या मृत्यूपूर्व बयानावर केवळ या तत्त्वज्ञानाच्या आधारावर विश्वास ठेवून आरोपीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने हा वादग्रस्त निर्णय रद्द केला. कायद्यातील केवळ एका सामान्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. आरोपीला ठोस व विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावरच दोषी ठरवले गेले पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगून मृत्युपूर्व बयानासंदर्भातील कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. न्यायालयांनी मृत्युपूर्व बयान हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, मृत्युपूर्व बयान देणारा उलट तपासणीसाठी न्यायालयामध्ये उपस्थित नसतो. त्यामुळे मृत्युपूर्व बयानावर विश्वास ठेवण्यापूर्वी ते स्वेच्छेने दिले गेले असल्याचे, खरे असल्याचे व जखमीची मानसिक स्थिती चांगली असताना दिले गेले असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. ही खात्री पटल्यानंतर केवळ मृत्युपूर्व बयानाच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकते. त्याकरिता बयानाचे समर्थन करणाऱ्या अन्य पुराव्यांची गरज नाही असे उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

बयान अविश्वसनीय, पती निर्दोष
पत्नीचा जाळून खून केल्याचा आरोप असणाऱ्या विठ्ठल लहू चौधरी (३३) या आरोपीला उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे निर्दोष सोडले. आरोपीच्या पत्नीचे नाव साधना होते. तिचे मृत्युपूर्व बयान उच्च न्यायालयाने अविश्वसनीय ठरवले. मृत्युपूर्व बयानावर विश्वास ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी प्रकरणातून गहाळ असल्याचे निरीक्षण हा निर्णय देताना नोंदविण्यात आले. फौजदारी प्रकरणात पुरावे लक्षात घेताना संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे. सरकार पक्षाने संशयाला जागा न ठेवता गुन्हा सिद्ध केला पाहिजे. आरोपीला संशयाच्या बळावर दोषी ठरविण्याची कायदा परवानगी देत नाही असेही या निर्णयात नमूद करण्यात आले.

असे आहे प्रकरण
ही घटना १५ जुलै २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी आरोपी घुग्गुस (जि. चंद्रपूर) पोलिसांच्या हद्दीतील वांढरी फाटा येथे राहात होता. घटनेच्या पाच वर्षांपूर्वी आरोपीचे साधनासोबत लग्न झाले होते. तो साधनाला चांगली वागणूक देत नव्हता. दरम्यान, त्याने साधनाला जाळून ठार मारले असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. चंद्रपूर सत्र न्यायालयाने साधनाच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारावर खुनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याचे अपील मंजूर झाले.

 

Web Title: The accused can not be held guilty only by philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.