आॅनलाईन लोकमतनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन विक्री करणाऱ्या एका आरोपीला सहायक सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि १५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अजय ऊर्फ विलियम अॅन्थोनी फ्रान्सिस (३०) रा. नारी रोड म्हाडा कॉलनी, असे आरोपीचे नाव आहे. या खटल्यात श्रीपाल देवराम सूर्यवंशी (२५) रा. नवेली गाव , जिल्हा रतलाम (मध्य प्रदेश) हाही आरोपी असून तो फरार आहे. त्याला अटक होताच त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालविण्यात येणार आहे.प्रकरण असे की, पीडित मुलीने आठव्या वर्गापासून शाळा सोडली होती. ती कॅटरिंगच्या कामाला जाऊ लागली होती. ४ जून २०१६ रोजी कॅटरिंगच्या कामावरील अजय फ्रान्सिस याने फूस लावून या मुलीला पळवून नेले होते. तिची श्रीपाल सूर्यवंशी याच्याकडे विक्री करून त्याच्याशी लग्न लावून दिले होते.पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३६३, ३६६, ३४२, ३७३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून ११ जून २०१६ रोजी अजय फ्रान्सिस याला अटक केली होती. प्रत्यक्ष मुलीची खरेदी करणारा आरोपी श्रीपाल हा आढळून आला नाही. त्याला फरार दर्शवण्यात आले. महिला सहायक फौजदार निर्मला बडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी अजय फ्रान्सिस याला भादंविच्या ३६३ कलमांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ३६६ कलमांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ३४२ कलमांतर्गत सहा महिने कारावास आणि भादंविच्या ३७३ कलमांतर्गत एक वर्ष कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अजय माहूरकर, आरोपीच्या वतीने अॅड. ममता जयसिंघानी यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल फय्याज, रविकिरण भास्करवार आणि मुकुंद जयस्वाल यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.