नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या आरोपीवर दया दाखवली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवून मेट्रो व्हिजन बिल्डकॉन कंपनीच्या विक्रम नाईकचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
मेट्रो व्हिजन बिल्डकॉनने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी फसवले. आरोपींनी थंड डोक्याने कट रचून गुंतवणूकदारांना स्वत:च्या जाळ्यात ओढले व त्यांच्या परिश्रमाची कमाई फस्त केली. अशा आरोपींना कठोरतेने हाताळणे आवश्यक आहे. आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देऊन प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे असेही न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.
या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. नाईकने इतर आरोपींसोबत मिळून गुंतवणूकदारांकडून १२ कोटी रुपये गोळा केले. हा सुमारे ६६ कोटी १३ लाख रुपयांचा घोटाळा आहे. गुंतवणूकदारांनी अधिक पैसे मिळवण्यासाठी स्वत:हून कंपनीच्या योजनेत गुंतवणूक केली, असा बचाव आरोपीने केला होता. उच्च न्यायालयाने हा बचावही अमान्य करून आरोपीला दणका दिला.