गोकुळपेठ बाजारातील खूनप्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्वनियोजित कट रचून अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोकुळपेठ बाजारातील कंचन ट्रेडर्ससमोर सचिन प्रकाश सोमकुंवर याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडून खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी प्रदीप पुरणदास उईके (२४) रा. कुंभारटोली, असे आरोपीचे नाव आहे. प्रकरण असे की, मृत सचिन सोमकुंवर आणि साथीदारांनी बाल्या उईके याचा खून केला होता. जुने वैमनस्य आणि बाल्याच्या खुनाचा सूड म्हणून सचिनचा खून करण्यात आला. घटनेच्या दिवशी २९ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी १.५० वाजताच्या सुमारास सचिन सोमकुंवर आणि त्याचा मित्र सूरज डोंगरे हे गोकुळपेठ बाजारातील पांडे हार्डवेअर येथे कामानिमित्त गेले होते. तेथून परत जात असताना मोटरसायकलने आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून सूरज डोंगरे याला जखमी तर सचिन सोमकुंवर याला जागीच ठार केले होते. सूरज अशोक डोंगरे (२३) रा. पांढराबोडी याच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), ३४, शस्त्र कायद्याच्या ३/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून राजा ऊर्फ अमर परतेकी (२३) रा. सुदामनगरी, अंकेश अशोक उईके (२८), रोशन दिलीप परतेकी (२६) आणि प्रदीप उईके, अशा चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मीना प्रकाश सोमकुंवर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने करावा, असे आदेश दिले होते. १५ जून २०१७ पासून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत. आरोपींपैकी प्रदीप उईके याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अजय माहुरकर यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन लुले हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.
आरोपीला जामीन नाकारला
By admin | Published: June 21, 2017 2:22 AM