नागपूर - कमाल चौकाजवळ सोमवारी रात्री झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भुऱ्या ऊर्फ सोनू अब्दुल शकूर (वय २२) याला अटक केली. मृताचे नाव स्पष्ट झाले नसले तरी त्याला बोरकर म्हणून आजूबाजूची मंडळी आवाज देत होती.
आरोपी भूुऱ्या फूटपाथवर राहात होता तर बोरकर भिक मागून जगायचा. दोघांनाही व्यसन होते. ते सायकलच्या पंक्चरसाठी वापरण्यात येणारे सोल्युशन (चिकट द्रव) घेऊन नशा भागवीत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघे नशा करीत बसले. नशा चढल्याने त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. बोरकरने भुऱ्याला आईची शिवी दिली. त्यावरून भुऱ्या चिडला आणि त्याने बाजूचा दगड उचलून बोरकरला ठेचून मारले. तेथून आरोपी पळून गेला. माहिती मिळाल्यानंतर पाचपावली आणि गुन्हे शाखेचा पोलीस ताफा तेथे पोहचला. चाैकशीत एकाने भुऱ्याचे नाव सांगितले. पोलिसांनी भुऱ्याला ताब्यात घेतले तेव्हा नशेमुळे त्याला काहीही बोलता येत नव्हते. मध्यरात्री नशा हलकी झाल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
---
गिट्टीखदानमध्ये भिकाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका भिकाऱ्यावर असाच जीवघेणा हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकली नाही.
----