नागपूर : प्रेमसंबंध तोडल्यामुळे ठार मारलेल्या मुलीच्या जन्मदिवशीच आरोपीला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व दंड न भरल्यास आरोपीला तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायालयाच्या न्या. एस. एम. कणकदंडे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
रोहित मनोहर हेमनानी उर्फ भोलानी (२५) असे आरोपीचे नाव असून, तो खामल्यातील सिंधी कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. घटनेच्या वेळी मृत मुलगी १९ वर्षे वयाची होती. ती लक्ष्मीनगर येथे मामाच्या घरी राहून प्रतापनगरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, काही वादामुळे तिने हे संबंध तोडले होते. परिणामी, आरोपी बेभान झाला होता.
तो मुलीवर चिडून होता. १ जुलै २०१८ रोजी रात्री ८ च्या सुमारास तो मुलीला भेटण्यासाठी तिच्या मामाच्या कार्यालयात गेला. त्याला मुलीची हत्या करायची होती. त्यामुळे त्याने कट्यार सोबत घेतले होते. ते कट्यार त्याने कंबरेत लपवून ठेवले होते. मुलगी भेटायला आल्यानंतर त्याने प्रेमसंबंध का तोडले, अशी विचारणा करून हुज्जत घालायला सुरुवात केली.
मुलीने त्याच्यासोबत संबंध ठेवायचे नाही, असे स्पष्टपणे सांगितले. परिणामी, आरोपीने कट्यार बाहेर काढून मुलीच्या शरीरावर जागोजागी वार केले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिचा २० सप्टेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. माधुरी मोटघरे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीवरील हत्येचा गुन्हा सिद्ध केला.