लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुन्हेगारांनी धमकी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कमलेश बंडू सहारे (वय २६) नामक तरुणाला जीव गमवावा लागला. दरम्यान, कपिलनगर पोलिसांनी त्याची हत्या करणारे आरोपी उज्ज्वल (वय २१) त्याचा भाऊ दीपक गलगट (वय २४) आणि त्यांचा साथीदार साहिल अल्ताफ खान (वय २४, रा. रमाईनगर) या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे बुधवारी रात्रीपासून म्हाडा क्वॉर्टर परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.
बुधवारी रात्री उज्ज्वल आणि दीपकने साहिलच्या मदतीने कमलेश सहारेची हत्या केली होती. कमलेश विवाहित आहे. मात्र, चार वर्षापूर्वी पत्नी त्याला सोडून निघून गेली. कमलेशची बहिण अश्विनी विलियम फ्रान्सिस गलगट बंधूच्या घरासमोर राहते. कमलेशचे बहिणीच्या घरी येणे-जाणे होते. त्याने गलगट बंधूच्या बहिणीवर नजर फिरवली होती. तो तिच्याशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न करीत होता. कमलेश विवाहित असूनही बहिणीशी सूत जुळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे ध्यानात आल्यामुळे गलगट बंधू संतप्त झाले होते. त्यांनी कमलेशविरुद्ध १७ जुलैला कपिलनगर ठाण्यात छेडखानीची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात कमलेशला अटकही झाली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर गलगट बंधूनी कमलेशला वस्तीत न येण्याची धमकी दिली होती. मंगळवारी आरोपीना कमलेश म्हाडा क्वाॅर्टर परिसरात दिसल्यामुळे त्यांनी त्याला पुन्हा इकडे आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करून बुधवारी रात्री ७ च्या सुमारास कमलेश म्हाडा क्वाॅर्टरमध्ये बहिणीकडे आला. ते कळताच आरोपींनी धारदार शस्त्रांचे घाव घालून त्याची हत्या केली.
----
कट रचून केली हत्या ?
कमलेशची हत्या करणारा आरोपी उज्ज्वल गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने एकदा तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरा गुन्हेगार साहिल खान यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत.
कमलेशच्या कुटुंबीयांच्या मते कटकारस्थान रचून कमलेशची हत्या करण्यात आली. त्याला एका तरुणीने फोन करून तेथे बोलविले होते आणि तयारीत असलेल्या आरोपींनी त्याची हत्या केली.
-----