लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉम्प्युटर इंजिनीअर पत्नीला चौथ्या माळ्यावरून ढकलून ठार मारण्याच्या तसेच हुंड्यासाठी छळल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. साकेत तामगाडगे असे त्याचे नाव आहे.
कॉम्प्युटर इंजिनीअर असलेल्या करिश्मा नामक तरुणीचा सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या साकेत तामगाडगेसोबत २० ऑगस्ट २०२० ला विवाह झाला होता. लग्नात मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून रुष्ट झालेल्या सासरच्यांनी करिश्माचा छळ सुरू केला. २३ डिसेंबरला सायंकाळी करिश्मा चौथ्या माळ्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत उभी असताना आरोपी सासरा भीमराव तामगाडगे याने तिला धक्का देऊन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. करिश्मा गंभीर जखमी झाली असून सध्या खासगी इस्पितळात उपचार घेत आहे. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी पती साकेत, सासरा भीमराव, सासू, नणंद आणि तिचा पती अशा पाच आरोपींवर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला. या पार्श्वभूमीवर, साकेतने बुधवारी मध्यरात्री स्वत:च्या हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. घरच्यांनी त्याला खासगी इस्पितळात दाखल केले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
---
पोलिसांना जबाब मिळालाच नाही
साकेतने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळाल्याने हुडकेश्वर पोलिसांनी लगेच इस्पितळ गाठून त्याचा जबाब नोंदविण्याचे प्रयत्न केले. मात्र, साकेत अतिदक्षता विभागात दाखल असून त्याची स्थिती गंभीर असल्याने पोलिसांना त्याचा जबाब नोंदविता आला नाही. घरच्यांकडूनही यासंबंधाने समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे हुडकेश्वर पोलिसांनी सांगितले.
---