चारित्र्यावर संशय घेऊन छळ : पत्नीला केले आत्महत्येस प्रवृत्तलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांच्या न्यायालयाने सात वर्षे साधा कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दादाराव नंदाराम गजबे (४९) असे आरोपीचे नाव असून, तो नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठविभाग येथील रहिवासी आहे. पुष्पकांता दादाराव गजबे (४०), असे मृत महिलेचे नाव होते. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दादाराव हा कोणताही कामधंदा न करता दारू प्यायचा आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ करायचा. मृत पुष्पकांता मात्र मजुरी करून आपल्या दोन मुलींचा सांभाळ करायची. घटनेच्या दिवशी २९ एप्रिल २०१६ रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. त्याने दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण करून तिला मारहाण केली होती. मुलीने त्याला हटकले असता त्याने तिचीही कॉलर पकडली होती. तू जहर पिऊन मरून जा, असे तो पत्नीला म्हणाला होता. त्यामुळे पुष्पकांताने स्वयंपाकखोलीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मुलगी स्वीटी दादाराव गजबे (१८) हिच्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी दादारावविरुद्ध १ मे २०१६ रोजी भादंविच्या ४९८-अ आणि ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून २३ जून २०१६ रोजी त्याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक दिलीप मसराम यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी दादाराव गजबे याला भादंविच्या ४९८-अ कलमांतर्गत तीन वर्षे साधा कारावास, एक हजार रुपये दंड, भादंविच्या ३०६ कलमांतर्गत सात वर्षे साधा कारावास आणि दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील दीपिका गवळी तर आरोपीच्या वतीने अॅड. पुरुषोत्तम नारनवरे यांनी काम पाहिले. सहायक फौजदार दिलीप कडू, रमेश भुसारी आणि हेड कॉन्स्टेबल किशोर ठाकूर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.
आरोपी पतीला सात वर्षे कारावास
By admin | Published: June 30, 2017 2:34 AM