कन्हान (नागपूर) : प्रेमविवाहानंतर अवघ्या १९ महिन्यांत कौटुंबिक कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडणे व्हायला सुरुवात झाली. याच भांडणातून चाकूने भोसकून पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी येथे मंगळवारी (दि. ३१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून, आरोपी पतीने सकाळी १०.३० च्या सुमारास पोलिस ठाणे गाठून समर्पण केले.
डुलेश्वरी अमित भोयर (२९) असे मृत पत्नीचे, तर अमित नारायण भोयर (२८), दोघेही रा. महाजननगर, टेकाडी, ता. पारशिवनी असे आरोपी पतीचे नाव आहे. डुलेश्वरी मूळची कामठी शहरातील रहिवासी असून, तिची व अमितची जानेवारी २०२२ मध्ये मैत्री झाली. पुढे ही मैत्री प्रेमात रूपांतरित झाल्यानंतर दोघांनीही ५ मार्च २०२२ रोजी विवाह केला. सुरुवातीच्या काळात त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर दोघांमध्ये उत्पन्न आणि खर्च यांतून भांडणे व्हायला सुरुवात झाली.
भांडणे वाढत असल्याने अमितच्या कुटुंबीयांनी दोघांनाही वेगळे राहण्याची सूचना केल्याने ते काही दिवस कामठी शहरात भाड्याने राहिले. तिथेही त्यांच्यात भांडणे होत असल्याने घरमालकाने त्यांना घर सोडायला लावल्याने दोघेही पुन्हा टेकाडी येथे राहायला आले. मंगळवारी सकाळी त्या दोघांमध्ये झालेले भांडण विकोपास गेले आणि अमितने किचनमधील सज्जावर ठेवलेला चाकू काढून तिच्या मान व पोटावर वार केले. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच ठाणेदार सार्थक नेहेते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी भादंवि ३०२, ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नऊ महिन्यांची आद्या पोरकी
डुलेश्वरी व अमित यांना नऊ महिन्यांची आद्या नावाची मुलगी आहे. आई व वडिलांच्या भांडणात ती मात्र आईला पोरकी झाली आहे. आईच्या हत्येनंतर पोलिसांनी आद्याला तिचे आजोबा (आईचे वडील) रामकृष्ण देवगडे, रा. रनाळा, ता. कामठी यांच्या सुपुर्द केले. विशेष म्हणजे, आद्या अधूनमधून आईवडिलांविना तिच्या आजोबांकडे राहायची.
पैशासाठी द्यायचा त्रास?
आरोपी अमितने घटनेच्या दीड तासानंतर पोलिस ठाणे गाठले व संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. दुसरीकडे, अमित मालवाहू वाहन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी करायचा. यातून तो डुलेश्वरीला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. तिने एकदा आपल्याकडून ३० हजार रुपये नेले होते. पैसे न आणल्याने मंगळवारी सकाळी दाेघांचे भांडण झाले, अशी माहिती डुलेश्वरीचे वडील रामकृष्ण देवगडे यांनी पोलिस तक्रारीत नमूद केली आहे.