नागपूर : घरफोडीमध्ये ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीदरम्यान तो वाहनचोर व खंडणीखोर गुन्हेगार असल्याची बाबदेखील समोर आली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
शबाना परवीन जुल्फेकार अली (५०, टीचर्स कॉलनी) या त्यांच्या घराला कुलूप लावून २१ सप्टेंबर रोजी नातेवाईंकाकडे गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरफोडी केली होती. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनतर्फे समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून घरफोडीत शाहरूख हनिफ खान (२८, विराई गुलमोहर सोसायटी, टेकानाका) हा सहभागी असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली.
चौकशीदरम्यान त्याने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. तसेच एका व्यक्तीला खंडणी मागितल्याचीदेखील कबुली दिली. पोलिसांनिी त्याच्याकडून चोरी गेलेले दागिने, रोख साडेनऊ हजार, दुचाकी असा ६.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, नवनाथ देवकाते, ईश्वर खोरडे, मुकेश राऊत, अनुप तायवाडे, अमोल जासुद, मनिष रामटेके, संतोष चौधरी, मिलींद चौधरी, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.